डाळ-तांदूळ भिजवण्याची झंझट विसरा! आता फक्त ५ मिनिटांत कुरकुरीत डोसा बनवता येईल. तांदूळ, उडीद डाळ, मेथी आणि पोहे वापरून घरच्या घरी इन्स्टंट डोसा मिक्स कसं बनवायचं ते जाणून घ्या. हे पीठ तुम्ही ६ महिने आरामात स्टोअर करू शकता.
साऊथ इंडियन डोसा आता सगळीकडेच फेमस झालाय. पण डोसा बनवायचा म्हणजे आदल्या दिवशी डाळ-तांदूळ भिजत घालणं आलंच. आजकालच्या धावपळीच्या काळात, विशेषतः नोकरी करणाऱ्या महिलांना हे सगळं करायला वेळ नसतो. म्हणूनच तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने डोसा मिक्स बनवून ठेवू शकता. रव्यासारखं दिसणारं हे डोसा मिक्स तुम्ही बाहेर ३ महिने आणि फ्रिजमध्ये ६ महिने आरामात स्टोअर करू शकता. जेव्हा डोसा खावासा वाटेल, तेव्हा फक्त ५ मिनिटांत तुम्ही तो बनवू शकता.
हे डोसा मिक्स कसं बनवायचं ते आता आपण पाहूया. इन्स्टाग्रामवर 'chef_mohan_tips' या शेफने याच्या खास टिप्स शेअर केल्या आहेत. ३ वाटी तांदूळ आणि १ वाटी उडीद डाळ या प्रमाणात हे मिक्स बनवायचं आहे.
साहित्य:
२०० ग्रॅम उडीद डाळ
२० ग्रॅम मेथी दाणे
५० ग्रॅम जाड पोहे
६०० ग्रॅम डोसा तांदूळ (किंवा इडली राईस)
कृती:
सर्वांत आधी मिक्सरच्या भांड्यात २०० ग्रॅम उडीद डाळ घ्या.
त्यात २० ग्रॅम मेथी दाणे घाला (यामुळे डोशाला छान सोनेरी रंग येतो).
हे मिश्रण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. त्याची एकदम बारीक पावडर करू नका. हे एका बाजुला काढून ठेवा.
यानंतर मिक्सरमध्ये ५० ग्रॅम पोहे घाला.
त्यात ६०० ग्रॅम इडली राईस (तांदूळ) मिक्स करा.
हे सुद्धा जाडसर वाटून घ्या. मिक्सरचं भांडं गरम होणार नाही याची काळजी घ्या. हे मिश्रण रव्यासारखं जाडसर असायला हवं, एकदम बारीक नको.
आता हे सगळं एकत्र करून एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा. हे मिक्स बाहेर ३ महिने आणि फ्रिजमध्ये ६ महिने चांगलं राहतं.
जेव्हा तुम्हाला डोसा बनवायचा असेल, तेव्हा ३ कप डोसा मिक्स पावडर, १ कप ताक आणि अर्धा कप पाणी एकत्र करून घ्या. यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
गॅसवर तवा गरम करा, त्यावर थोडं पाणी शिंपडा आणि सुक्या कापडाने पुसून घ्या. आता यावर डोशाचं पीठ पसरा आणि वरून बटर, तूप किंवा तेल सोडा. तुमचा क्रिस्पी डोसा तयार!