
मल्लपुरम : एका अज्ञात नंबरवरून आलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यामुळे केरळ राज्य वीज मंडळाच्या (KSEB) एका कर्मचाऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. तिरुनावाया KSEB ऑफिसमध्ये तात्पुरता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद झकेरिया (पूर्ण नाव: करिम्पनक्कल मोहम्मद झकेरिया, रा. साऊथ पल्लार) यांच्यासोबत हा प्रकार घडला. या फसवणुकीत त्यांचे पैसे तर गेलेच, पण त्यांच्या फोनमधील सगळा डेटाही चोरीला गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
SBI च्या YONO App कडून आल्याचा बनाव करत हा मेसेज पाठवण्यात आला होता. झकेरिया यांनी त्यातील लिंकवर क्लिक करताच त्यांचा फोन पूर्णपणे हँग झाला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच ऑफिसमधील इतर दोन कर्मचाऱ्यांसोबतही असाच प्रकार घडला होता. ऑफिसच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या एका PDF मेसेज आणि लिंकमुळे त्यांनाही फटका बसला. त्यांचं व्हॉट्सॲप बंद पडलं आणि फोनमधील डेटा चोरीला गेला. इतकंच नाही, तर त्यांच्या नंबरवरून त्यांच्या सर्व कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुप्समध्ये आपोआप एक बनावट मेसेज फॉरवर्ड झाला. ज्यांनी-ज्यांनी तो मेसेज उघडला, त्या सर्वांचा डेटा चोरीला गेल्याचं तिरूर पोलीस स्टेशन आणि सायबर सेलमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.