
कधीकधी अंगदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी (Headache) यांसारख्या समस्या उदभवल्यास आपण वेदनाशामक गोळी घेतो. अशा वेदना त्यामुळे लवकर बऱ्या होतात. पण त्यामुळे आपल्या शरीराला होणाऱ्या हानीचा विचार कोणी करत नाही. त्यामुळे, त्यावर कायमस्वरूपी उपाय काय आहे याबद्दल कोणीही विचार करत नाही. एका छोट्या गोळीने काही विशेष त्रास होणार नाही, अशा गैरसमजातच लोक राहतात.
स्त्री-पुरुष असा भेद न करता सर्वजण समानतेने काम करत असलेल्या या काळात प्रत्येकावरचा ताण वाढलेला असतो. तणावामुळे डोकेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. काहींना हार्मोनल असंतुलन किंवा मायग्रेनमुळेही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. डोकेदुखीमुळे काम करता येत नाही या कारणास्तव लोक त्वरित वेदनाशामक गोळ्या घेतात. अशा गोळ्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. विशेषतः डोकेदुखी सुरू होताच गोळ्या घेणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
डोकेदुखी सुरू होताच गोळी खाऊ नका: डोकेदुखीवर उपाय म्हणून ओव्हर-द-काउंटर गोळ्या क्वचित आणि मर्यादित प्रमाणात घेतल्या जाऊ शकतात. पण एकदा ती गोळी घेतल्यावर पुढच्या वेळी डोकेदुखी झाल्यास पुन्हा वेदनाशामक गोळी घ्यावीशी वाटते. त्या क्षणी वेदनेपासून आराम मिळणे हेच महत्त्वाचे वाटते.
डोकेदुखी घालवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेतल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. ज्यांना हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी वेदनाशामक गोळ्या अत्यंत धोकादायक आहेत. अनेक अभ्यासांनुसार, जे लोक नियमितपणे डोकेदुखीच्या गोळ्या वापरतात, त्यांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो.
डोकेदुखीसाठी गोळ्या घेतल्याने हे त्रास होतात:
• गोळ्यांच्या ओव्हरडोजमुळे पोट आणि शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर गंभीर परिणाम होतो.
• वेदनाशामक गोळ्यांमुळे पोटदुखी, पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.
• पेनकिलर जास्त घेतल्याने यकृत (लिव्हर), किडनी यांसारख्या अवयवांवरही वाईट परिणाम होतो. वेदनाशामक गोळ्यांमधील विषारी घटक यकृतामध्ये जमा होतात, ज्यामुळे यकृताला हानी पोहोचते.
• वेदनाशामक गोळ्या जास्त घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील नष्ट होऊ शकते. यामुळे शरीर रोगांशी लढण्याची क्षमता गमावते.
• वेदनाशामक गोळ्यांमुळे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो.
• प्रत्येक वेळी डोकेदुखी झाल्यावर पेनकिलर घेतल्यास पोटाचा अल्सर होऊ शकतो.
वेदना कमी करणाऱ्या गोळ्यांचे सेवन कोणत्याही परिस्थितीत चांगले नाही. यामुळे तोटेच जास्त आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वेदना असल्यास, आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच कोणत्या गोळ्या किती प्रमाणात घ्यायच्या हे ठरवा.