
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुक करताना, विशेषतः तत्काळ बुकिंगच्या वेळी वेबसाईट क्रॅश होण्याची किंवा स्लो होण्याची समस्या आता कायमची दूर होणार आहे. भारतीय रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग सांभाळणारी संस्था IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) आपल्या सिस्टीममध्ये मोठे बदल करत आहे. 'नेक्स्ट जनरेशन ई-तिकिटिंग' (NGET) नावाच्या या प्रणालीला तब्बल १५० कोटी रुपये खर्च करून अपग्रेड केलं जात आहे.
सध्या देशातील तब्बल ८९ टक्के रेल्वेची आरक्षित तिकीटं ऑनलाईन बुक केली जातात. गेल्या एका वर्षातच ५७.९० कोटींपेक्षा जास्त तिकीटं ऑनलाईन विकली गेली आहेत. रोज सकाळी ८, १० आणि ११ वाजता तत्काळ किंवा ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यावर लाखो लोक एकाच वेळी वेबसाईटवर येतात. यामुळे वेबसाईटवर प्रचंड लोड येऊन ती क्रॅश होते किंवा खूप स्लो चालते. हीच समस्या सोडवण्यासाठी हे मोठे बदल केले जात आहेत.
IRCTC या योजनेवर सुमारे १५० कोटी रुपये खर्च करत असून, यात दोन मुख्य तांत्रिक बदल केले जात आहेत. सध्या IRCTC च्या वेबसाईटवर एका मिनिटात ३७,००० तिकीटं बुक करण्याची क्षमता आहे. आता हार्डवेअर, सर्व्हर, नेटवर्किंग आणि सॉफ्टवेअर अपग्रेड करून ही क्षमता प्रति मिनिट १ लाखांपेक्षा जास्त तिकिटांपर्यंत वाढवली जात आहे. याशिवाय, तेलंगणातील सिकंदराबादमध्ये एक 'ॲक्टिव्ह-ॲक्टिव्ह डिझास्टर रिकव्हरी' बॅकअप सिस्टीम उभारली जात आहे. याचा अर्थ, जर कधी मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाला, तर वेबसाईट बंद न पडता बॅकअप सिस्टीमवर लगेच सुरू होईल.
जयपूरच्या MNIT च्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे रेल्वे मंत्रालयाने वेबसाईटची नवीन 'बीटा' आवृत्ती तयार केली आहे. यामध्ये प्रवाशांना ४ मोठे फायदे मिळणार आहेत:
या नवीन तांत्रिक बदलांमुळे आता रेल्वे प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय तत्काळ आणि सामान्य तिकीटं अधिक वेगाने आणि सहजपणे बुक करता येणार आहेत.