
BeiDou System इराण चीनची सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम 'बाइडो' (BeiDou) वापरत आहे का? मध्य पूर्वेतील तणावाच्या परिस्थितीत हा प्रश्न सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, इराण आता पूर्वीपेक्षा जास्त अचूकपणे इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर निशाणा साधू शकत आहे. या अचूकतेमागे चीनच्या बाइडो नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमचा (BDS) वापर हे कारण असल्याचा संशय आहे.
फ्रान्सच्या गुप्तचर विभागाचे माजी संचालक एलेन जुलिएट (Alain Juillet) यांनी नुकतंच 'टॉक्सिनो' (Toxino) नावाच्या एका फ्रेंच पॉडकास्टमध्ये बोलताना या शक्यतेकडे लक्ष वेधलं. त्यांच्या मते, गेल्या वर्षी इस्रायलसोबत झालेल्या १२ दिवसांच्या युद्धानंतर आता इराणच्या मिसाइल हल्ल्यांच्या अचूकतेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे इराण चीनच्या बाइडो नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर करत असावा, असा अंदाज एलेन यांनी व्यक्त केला आहे.
बाइडो नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (BDS) ही चीनने विकसित केलेली एक ग्लोबल सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम आहे. आपल्या गाडीतल्या किंवा मोबाईलमधल्या अमेरिकन जीपीएस (GPS) सारखीच ही एक सिस्टीम आहे, पण ती चीनची आहे. २०२० मध्ये ही सिस्टीम अधिकृतपणे सुरू झाली. अमेरिकेची जीपीएस सिस्टीम जवळपास २४ सॅटेलाइट्स वापरते, तर चीनची बाइडो सिस्टीम तब्बल ४५ सॅटेलाइट्सच्या मदतीने काम करते. जास्त सॅटेलाइट्स वापरल्यामुळे ठिकाण निश्चित करण्यात जास्त अचूकता मिळते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मिसाइल आणि ड्रोन सामान्यतः 'इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम'वर अवलंबून असतात. पण जसजसं अंतर वाढतं, तसतशी या सिस्टीममध्ये छोट्या चुका होण्याची शक्यता असते. मात्र, सॅटेलाइट नेव्हिगेशन वापरल्यास या चुका दुरुस्त करून मिसाइलचा मार्ग अधिक अचूकपणे नियंत्रित करता येतो. त्यामुळे बाइडोसारख्या सिस्टीममुळे मिसाइल हल्ल्यांची अचूकता वाढण्यास मदत होऊ शकते.
काही संशोधकांच्या मते, इराणने २०१५ पासूनच बाइडो तंत्रज्ञान आपल्या लष्करी प्रणालीत वापरण्याचे प्रयत्न सुरू केले होते. २०२१ मध्ये चीनसोबत झालेल्या एका मोठ्या करारानंतर हे सहकार्य आणखी घट्ट झाले असावे, असा अंदाज आहे. अर्थात, बाइडो वापरत असल्याची अधिकृत कबुली इराणने दिलेली नाही. पण जर हे खरं असेल, तर आधुनिक युद्धतंत्रात मोठे बदल होऊ शकतात. अनेक देश अमेरिकेच्या जीपीएसवरील अवलंबित्व कमी करून वेगवेगळ्या सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर सुरू करू शकतात, असं तज्ज्ञांना वाटतं.