
जे लोक ऍपलच्या नव्या आयफोनची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच होणाऱ्या iPhone 18 Pro सीरिजसाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील, अशी शक्यता आहे. वाढत्या प्रोसेसर आणि मेमरीच्या खर्चामुळे कंपनी हा निर्णय घेऊ शकते.
MacRumors च्या एका रिपोर्टनुसार, GF Securities चे विश्लेषक जेफ पु (Jeff Pu) यांनी हा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची किंमत सध्याच्या iPhone 17 Pro मॉडेल्सपेक्षा २५० डॉलर (सुमारे २३,८०० रुपये) ते ३०० डॉलर (सुमारे २८,६०० रुपये) जास्त असू शकते. जर हे खरं ठरलं, तर ऍपलच्या हाय-एंड आयफोनच्या किमतीतली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असेल.
सध्या iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंमत $1,099 आहे, तर iPhone 17 Pro Max ची किंमत $1,199 पासून सुरू होते. जर यात २५०-३०० डॉलर्सची वाढ झाली, तर नवीन प्रो मॉडेल्स आणखी महाग होतील.
या संभाव्य दरवाढीमागे उत्पादन खर्चात झालेली वाढ हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातंय. ऍपल आपल्या नव्या फोनमध्ये TSMC ची नेक्स्ट-जनरेशन 2nm A20 चिप वापरणार आहे, जी बनवण्यासाठी सध्याच्या 3nm चिपपेक्षा खूपच महाग आहे. याशिवाय, AI मुळे जगभरात कंपोनंट्सचा तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे DRAM आणि NAND मेमरीच्या किमतीही वाढत आहेत.
जेफ पु यांच्या मते, या कारणांमुळे ऍपलला किंमत वाढवावी लागेल. पण त्यांनी अशीही भीती व्यक्त केली की, यामुळे ग्राहकांकडून मागणीत अनिश्चितता (demand uncertainty) निर्माण होऊ शकते.
विशेष म्हणजे, याआधी मे महिन्यात याच विश्लेषकाने ऍपल मेमरीच्या वाढत्या किमतीनंतरही iPhone 18 Pro सीरिजसाठी 'आक्रमक किंमत' (aggressive pricing) ठेवेल, असा अंदाज वर्तवला होता. पण आता त्यांनी आपला अंदाज बदलला आहे. ऍपलचे CEO टिम कुक (Tim Cook) यांनी कंपनीच्या मागील अर्निंग कॉलमध्ये कंपोनंट्सच्या वाढत्या खर्चाची कबुली दिली होती, पण त्यांनी आयफोनच्या किमती वाढणार की नाही, याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
भारतात सध्या iPhone 17 Pro ची किंमत १,३४,९०० रुपयांपासून सुरू होते. जर ही दरवाढ झाली, तर iPhone 18 Pro ची किंमत यापेक्षा खूप जास्त असेल. तसेच, iPhone 18 Pro Max ची किंमतही सध्याच्या १,४९,९०० रुपयांपेक्षा लक्षणीयरीत्या वाढेल.