
वाराणसी: 216 प्रवाशांना घेऊन बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला पक्षी धडकल्याने लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. ही घटना रविवारी रात्री घडली. विमानातील सर्व 216 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती विमानतळ संचालक पुनीत गुप्ता यांनी दिली. गोरखपूरहून बंगळुरूला जाणाऱ्या 6E 437 या विमानाच्या पुढील भागाचे पक्षी धडकल्याने नुकसान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पायलटने तात्काळ वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि विमान वाराणसी विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारी काही प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवण्यात आले आणि उर्वरित प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली, असे गुप्ता यांनी सांगितले.