
मुंबई : भारतीय वाहतूक व्यवस्थेत रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. बहुतांश लोक ट्रेननेच प्रवास करणं पसंत करतात. त्यामुळे दररोज गाड्यांमध्ये मोठी गर्दी असते. ट्रेन प्रवासात प्रवाशांना काही नियम पाळावे लागतात. आता यापैकी काही नियमांमध्ये रेल्वेने बदल केलेत. जुन्या सवयींनुसार प्रवास केल्यास आता तुम्हाला दंड बसू शकतो. नव्या नियमानुसार, ट्रेनमध्ये रील्स पाहण्यावर कोणतीही बंदी नाही. पण, रील्स पाहताना तुम्ही हा नियम मोडलात, तर मात्र कारवाई नक्की होईल.
रेल्वे नेहमी प्रवाशांची सुरक्षा आणि सोयीला प्राधान्य देते. गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये सगळेच जण मोबाईल वापरतात. पण नव्या नियमानुसार, आता ट्रेनमध्ये मोबाईलवर रील्स पाहताना तुम्हाला इअरफोन्स वापरणे सक्तीचे आहे. तुमच्या मोबाईलच्या स्पीकरचा आवाज शेजारी बसलेल्या प्रवाशांना त्रासदायक ठरू नये, हा यामागचा उद्देश आहे. यासोबतच तुम्हाला काही कडक नियमही पाळावे लागतील.
भरलेल्या ट्रेनमध्ये तुम्ही फोनवर बोलताना लाऊडस्पीकर ऑन करू शकत नाही. मोबाईलवर गाणी ऐकण्यासाठी तुम्ही इअरफोन्स किंवा इअरबड्सचाच वापर केला पाहिजे. तुम्ही फोनच्या स्पीकरवर गाणी, रील्स किंवा सिनेमे लावू शकत नाही. इतर प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वेने हा नियम कडक केलाय.
ट्रेन प्रवासात तुम्ही फोन आणि स्पीकरचे नियम मोडले, तर तुम्हाला मोठा दंड बसेल. यासाठी १००० रुपयांपासून ते ५००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. जर तुम्ही वारंवार हा नियम मोडलात, तर जास्तीत जास्त ५००० रुपये दंड आणि तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे ट्रेनमध्ये रील्स पाहताना किंवा मोबाईल वापरताना इअरफोन्सचा वापर करा, जेणेकरून तुम्ही दंडाच्या कारवाईपासून वाचाल.
दक्षिण रेल्वेने या सुधारित नियमांबाबत एक महत्त्वाचा आदेश काढलाय. त्यांनी सर्व सहा विभागीय झोनमध्ये हा आदेश लागू केलाय. जन विश्वास कायदा २०२६ (Jan Vishwas Act 2026) अंतर्गत तिकीट तपासनीस (TC) यावर लक्ष ठेवतील आणि नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करतील.
सध्या रेल्वे स्थानकांवर आणि इंडियन रेल्वेच्या ॲपवरही रेल्वे याबाबतचे संदेश देत आहे. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना प्रवाशांनी किमान नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना रेल्वे देत आहे. रेल्वे विभागाने यापूर्वीही अनेकदा प्रवाशांना याबाबत आवाहन केलं होतं. पण आता कडक नियमांच्या माध्यमातून रेल्वेने प्रवाशांना स्पष्ट इशारा दिलाय.