
आजकाल सोशल मीडिया म्हणजे फक्त फोटो आणि व्हिडिओ टाकण्याची जागा राहिलेली नाही, तर ती अक्षरशः पैसे छापण्याची मशीन बनली आहे. ओडिशाची प्रसिद्ध डिजिटल कंटेंट क्रिएटर सुभश्री साहू हिचं इन्स्टाग्राम अकाऊंट नुकतंच बंद झालं. पण ते बंद होण्याआधी इन्स्टाग्रामच्या 'पेड सबस्क्रिप्शन'मधून ती किती कमाई करत होती, याचा आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
इन्स्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, एक्स (ट्विटर) अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुभश्रीचे लाखो चाहते आहेत. ती प्रामुख्याने लाईफस्टाईल व्लॉग, डान्स व्हिडिओ आणि छोटे रील्स शेअर करायची. अकाऊंट बंद होण्यापूर्वी तिचे एकट्या इन्स्टाग्रामवर 1.3 मिलियन (13 लाख) फॉलोअर्स होते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यातले तब्बल ६,००० 'प्रीमियम सबस्क्रायबर्स' होते, जे तिला पैसे देऊन फॉलो करत होते.
हे सबस्क्रायबर्स प्रीमियम कंटेंट पाहण्यासाठी दर महिन्याला ३९९ रुपये द्यायचे. या हिशोबाने पाहिलं, तर सुभश्री फक्त सबस्क्रिप्शनमधून महिन्याला जवळपास २३ लाख रुपये कमावत होती. म्हणजेच, तिचं वार्षिक उत्पन्न सुमारे २.७ कोटी रुपये होतं.
तिची युट्यूबवरही चांगली कमाई आहे. 'सुभश्री साहू व्लॉग्स' नावाच्या तिच्या यूट्यूब चॅनलचे १.४२ लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. गेल्या दोन वर्षांत १३० व्हिडिओंमधून तिला १४.६८ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. माहितीनुसार, ती युट्यूबवरून दरमहा सुमारे ३७,००० रुपये (३९४ डॉलर्स) कमावते. याशिवाय, युट्यूबवरही तिने ११९ रुपयांपासून ते १,५९९ रुपयांपर्यंतचे वेगवेगळे पेड मेंबरशिप प्लॅन्स ठेवले आहेत. पण युट्यूबवर किती जणांनी हे प्लॅन्स घेतले आहेत, याचा नेमका आकडा उपलब्ध नाही. फक्त सुभश्रीच नाही, तर इन्स्टाग्रामच्या पेड सबस्क्रिप्शनमधून लाखो रुपये कमावणारे अनेक भारतीय स्टार्स आहेत.
अदिती मिस्त्री: हिचे २,३७७ सबस्क्रायबर्स आहेत आणि ती दरमहा २९० रुपये आकारते. तिची महिन्याची कमाई जवळपास ६.८९ लाख रुपये आहे.
मुस्कान करिया: हिचे ५,१५४ सबस्क्रायबर्स आहेत, जे प्रत्येकी ३९० रुपये देतात. तिची महिन्याची कमाई सुमारे २०.१ लाख रुपये आहे.
नेहा शर्मा: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माचे ६,९६७ सबस्क्रायबर्स आहेत. २९० रुपयांप्रमाणे ती महिन्याला जवळपास २०.२ लाख रुपये कमावते.
रिया अहिर: गेल्या जुलैमध्ये मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांची व्हॅन अडवून व्हायरल झालेली रिया आठवतेय का? या यादीत तिचे सर्वाधिक १०,९०० सबस्क्रायबर्स आहेत. ती फक्त १४० रुपये आकारत असली तरी, तिची महिन्याची कमाई १५.२६ लाखांच्या घरात आहे.
फिटगर्ल_08: सोनिया सिंग खत्री हिच्या या पेजचे ९,०७१ सबस्क्रायबर्स आहेत. ती ३९० रुपये आकारते. यातून ती महिन्याला ३५.४ लाख रुपये (म्हणजे वर्षाला ४.२ कोटी) कमावते.
जेव्हा कुणी पैसे देऊन सबस्क्रिप्शन घेतं, तेव्हा त्यांना सामान्य फॉलोअर्सपेक्षा काहीतरी वेगळं आणि खास कंटेंट मिळतं. यात जास्त ग्लॅमरस कपड्यांमधील फोटो, डान्स व्हिडिओ, बेडरूम व्लॉग्स आणि थेट चाहत्यांशी गप्पा मारण्याची संधी अशा गोष्टींचा समावेश असतो. काही स्टार्स तर या सबस्क्रिप्शनचा वापर 'ओन्लीफॅन्स' (OnlyFans) सारख्या इतर प्रीमियम प्लॅटफॉर्मवर चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी एक माध्यम म्हणून करतात, असंही म्हटलं जातं.