
हैदराबाद, 1 जानेवारी : IIT हैदराबादच्या विद्यार्थ्याने एक विक्रम रचला आहे. त्याने तब्बल 2.5 कोटी रुपयांच्या वार्षिक पॅकेजची नोकरी मिळवली आहे. IIT हैदराबादच्या इतिहासात विद्यार्थ्याला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक पॅकेजची ऑफर आहे. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा विद्यार्थी एडवर्ड नेथन वर्गीस याने ही कामगिरी केली आहे. आता नेथन वर्गीसवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एडवर्ड हा IIT हैदराबादमध्ये अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याला नेदरलँडमधील ऑप्टिव्हर ट्रेडिंग कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली आहे. या 21 वर्षीय विद्यार्थ्याने नुकतीच 2 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केली होती. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे एडवर्डने पहिल्याच मुलाखतीत 2.5 कोटी रुपयांच्या वार्षिक पगाराची नोकरी मिळवली आहे.
एडवर्ड नेथन वर्गीसचा जन्म आणि बालपण हैदराबादमध्येच झाले. पण सातवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण एडवर्डने बंगळूरुमध्ये घेतले. बारावीचे शिक्षण पूर्ण करून तो पुन्हा हैदराबादला परतला आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये उच्च शिक्षण घेण्यास सुरुवात केली. IIT हैदराबादमध्ये प्रवेश मिळवलेला एडवर्ड एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. आता एडवर्डच्या या यशाचा कॉलेज आणि पालकांना अभिमान वाटत आहे.
2.5 कोटी रुपयांच्या पगाराची नोकरीची ऑफर मिळाल्यानंतर एडवर्डने आपला आनंद व्यक्त केला. 'मला पहिल्याच मुलाखतीत ही ऑफर मिळाली. IIT हैदराबाद कॉलेज, प्राध्यापक आणि पालकांनी माझ्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे,' असे तो म्हणाला.