
आपल्यापैकी बहुतेक जण नारळ खाल्ल्यानंतर त्याची शेंडी किंवा काथ्या काही कामाचा नाही असं समजून फेकून देतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की हेच नैसर्गिक फायबर तुमच्या किचनसाठी एक जबरदस्त इको-फ्रेंडली स्क्रबर बनू शकतं? बाजारात मिळणारे प्लास्टिकचे स्क्रबर लवकर खराब होतात आणि त्यात बॅक्टेरियासुद्धा जमा होतात. याउलट, नारळाची शेंडी मजबूत, टिकाऊ असते आणि त्यात नैसर्गिकरित्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही असतात. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा स्क्रबर बनवायला तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. फक्त थोडी तयारी केली की तुमचा DIY स्क्रबर तयार!
सगळ्यात आधी नारळाची शेंडी मोकळी करून घ्या आणि तिला १०-१५ मिनिटं गरम पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्यातली धूळ, घाण आणि तेलकटपणा निघून जाईल. आता तिला बाहेर काढून लिंबाचा रस किंवा व्हिनेगर टाकलेल्या पाण्याने धुवा, म्हणजे त्यातले बॅक्टेरिया मरून जातील. यानंतर शेंडी कडक उन्हात पूर्णपणे वाळवून घ्या. जितकी चांगली वाळेल, तितका स्क्रबर जास्त मजबूत आणि टिकाऊ बनेल.
वाळलेल्या शेंडीला हाताने गोल किंवा चौरस आकारात वळा. आता धाग्याने किंवा तारेने त्याला मधोमध घट्ट बांधा, म्हणजे तो सुटणार नाही. तुम्हाला जाड स्क्रबर हवा असेल, तर तुम्ही मधोमध अजून थोडी शेंडी भरू शकता. झाला तयार तुमचा घरगुती डिशवॉश स्क्रबर! याने तुम्ही स्टीलची भांडी, कढई आणि तवा अगदी सहज स्वच्छ करू शकता.
हा स्क्रबर प्लास्टिक-फ्री, पर्यावरणपूरक आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. यात कोणतेही केमिकल नसल्यामुळे हाताच्या त्वचेलाही त्रास होत नाही. शिवाय, तो मजबूत असल्यामुळे करपलेली भांडीसुद्धा सहज घासता येतात.