Gold Prices : सोनं महाग झालं, भारतीयांनी दागिन्यांकडे पाठ फिरवली? WGC रिपोर्टमधून मोठा खुलासा

Published : Aug 04, 2026, 11:05 PM IST
Gold Prices : सोनं महाग झालं, भारतीयांनी दागिन्यांकडे पाठ फिरवली? WGC रिपोर्टमधून मोठा खुलासा

सार

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या नव्या रिपोर्टनुसार, जून तिमाहीत भारतात सोन्याच्या दागिन्यांची मागणी १५ टक्क्यांनी घटली आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने लोकांनी खरेदी कमी केली आहे. विशेष म्हणजे, विकलेल्या सोन्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी, वाढलेल्या दरांमुळे विक्रीचं मूल्य मात्र वाढलं आहे.

मुंबई : सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की सामान्य माणसाने सोनं खरेदी करणं कमी केलंय का? नवीन आकडेवारी तरी असंच काहीसं सांगतेय. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (WGC) ताज्या रिपोर्टनुसार, जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत भारतात सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. फक्त भारतातच नाही, तर जागतिक स्तरावरही दागिन्यांच्या बाजाराला कोरोना काळानंतरचा सर्वात मोठा फटका बसला आहे.

भारतातील आकडेवारी

मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतात सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीत १५ टक्क्यांची घट झाली आहे. जून तिमाहीत देशात फक्त ७५ टन सोन्याचे दागिने विकले गेले. याच काळात जागतिक मागणी २७८ टन होती. पण, वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत भारतात १४ टक्के वाढ दिसली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारतात एकूण १४१ टन सोनं विकलं गेलं (मागच्या वर्षीपेक्षा १७ टक्के कमी). पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, विकलेल्या सोन्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी, भाव वाढल्यामुळे विक्रीच्या मूल्यात २६ टक्क्यांची वाढ झाली. म्हणजेच, तब्बल २१ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय झाला.

वाढलेले भाव ठरले 'व्हिलन'

या सगळ्यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे सोन्याचे गगनाला भिडलेले भाव. दर इतके वाढले की लोकांनी सोनं खरेदी करणं कमी केलं किंवा कमी वजनाचे दागिने घेण्यास पसंती दिली. जगभरातही पहिल्या सहा महिन्यांत दागिन्यांच्या विक्रीचं प्रमाण कमी झालं, पण मूल्यानुसार त्यात २२ टक्के वाढ झाली.

गुंतवणूकदार आणि सेंट्रल बँका

सोन्याच्या दरातील बदलांचा परिणाम गुंतवणुकीवरही झाला. ईटीएफ (ETF), सोन्याची नाणी आणि बारमधील गुंतवणूक दुसऱ्या तिमाहीत २६२ टनांपर्यंत घसरली. नाणी आणि बारमधील गुंतवणुकीत ३ टक्के घट झाली. पण वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चांगली गुंतवणूक झाल्यामुळे, पहिल्या सहा महिन्यांचा विचार केल्यास यात २१ टक्के वाढ दिसून येते.

दुसरीकडे, पोलंड, चीन आणि झेक रिपब्लिकसारख्या देशांच्या सेंट्रल बँकांनी एप्रिल-जून तिमाहीत आपल्या गंगाजळीत तब्बल २८९ टन सोनं जमा केलं. भारताच्या रिझर्व्ह बँकेनेही (RBI) याच काळात २०० किलो सोनं खरेदी केलं.

उत्पादन आणि रिसायकलिंग

दुसऱ्या तिमाहीत सोन्याचा जागतिक पुरवठा १,२६९ टनांवर स्थिर राहिला. कॅनडा आणि चिलीसारख्या देशांमधून नवीन उत्पादन सुरू झाल्याने खाणींमधून होणारा पुरवठा २ टक्के वाढून ९६६ टन झाला. पण आश्चर्य म्हणजे, सोन्याचे भाव इतके वाढूनही जुनं सोनं विकणाऱ्यांची किंवा ते रिसायकल करणाऱ्यांची संख्या ६ टक्क्यांनी कमी झाली आहे.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

BigFlix: भारतात २००८ मध्येच सुरू झाला होता OTT प्लॅटफॉर्म! तुम्हाला माहितीये का ही गोष्ट?
Mahindra XUV 3XO CNG: महिंद्रा XUV 3XO मध्ये होणार मोठा बदल?