
मुंबई : डिजिटल व्यवहार आणि क्रिप्टोकरन्सीच्या जमान्यातही, आर्थिक संकटात देशांना आजही सोन्याचाच आधार वाटतो. जगभरात आर्थिक अनिश्चितता वाढत असल्यामुळे, अनेक देशांच्या सेंट्रल बँका पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा वाढवत आहेत. नुकत्याच आलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतंय की, देशांच्या आर्थिक धोरणांमध्ये सोनं आजही केंद्रस्थानी आहे.
या यादीत अमेरिका सगळ्यात पुढे आहे. अमेरिकेकडे तब्बल ८,१३३.५ टन सोन्याचा साठा आहे. हा साठा दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीच्या दुप्पट आहे. इतकंच नाही, तर जर्मनी, इटली आणि फ्रान्स या तिन्ही देशांचा एकूण साठा मिळवला, तरी तो अमेरिकेच्या जवळपास येतो. अमेरिका आणि युरोप मिळून जगातील एकूण अधिकृत सोन्याच्या साठ्यापैकी ६० टक्क्यांहून अधिक साठा त्यांच्याकडे आहे.
वाढती महागाई, चलनांच्या दरातील चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय राजकीय संकटं यांपासून बचाव करण्यासाठी देश सोन्याचा वापर एक सुरक्षित कवच म्हणून करतात. जरी सर्वात मोठा साठा पाश्चात्य देशांकडे असला, तरी आता इतर विकसनशील अर्थव्यवस्थाही मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत.
१. अमेरिका : ८,१३३.५ टन
२. जर्मनी : ३,३५१.६ टन
३. इटली : २,४५१.९ टन
४. फ्रान्स : २,४३७.० टन
५. रशिया : २,३३३.५ टन
६. चीन : २,२७९.६ टन
७. स्वित्झर्लंड : १,०४०.१ टन
८. भारत : ८७६.२ टन
९. जपान : ८४५.९ टन
१०. तुर्की :६१५.० टन
दमदार कामगिरीसह भारत आणि चीन
या जागतिक स्पर्धेत भारतानेही दमदार कामगिरी केली आहे. ८७६.२ टन सोन्याच्या साठ्यासह भारत जगात आठव्या क्रमांकावर आहे. अनेक विकसित देशांना मागे टाकत भारताने हे स्थान मिळवलं आहे. गुंतवणुकीत विविधता आणण्यासाठी आणि पारंपरिक मालमत्तेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने अलीकडच्या काळात सोन्याचा साठा लक्षणीयरीत्या वाढवला आहे.
त्याचवेळी, चीनने केलेला सोन्याचा साठाही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. फक्त २०१९ ते २०२४ या काळात चीनने आपल्या साठ्यात ३३१ टन सोन्याची भर घातली. यामुळे चीनचा एकूण साठा जवळपास २,२८० टनांवर पोहोचला आहे. आर्थिक आणि राजकीय धक्क्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी पोलंड आणि तुर्कीसारखे देशही आपला सोन्याचा साठा वाढवत आहेत.
मोठे देशच नाही, ट्रेंड बदलतोय
आता फक्त मोठ्या आर्थिक महासत्ताच सोनं खरेदी करत नाहीत. उझबेकिस्तान, सौदी अरेबिया, कझाकस्तान, थायलंड आणि सिंगापूरसारखे देशही आपला सोन्याचा साठा हळूहळू वाढवत आहेत. ज्याचं मूल्य कधीच कमी होत नाही, अशी सर्वोत्तम संपत्ती म्हणून जग आजही सोन्याकडेच पाहतं. सोन्याचे चढे भाव आणि सेंट्रल बँकांची सततची मागणी यामुळे सोनं जगातील सर्वात महत्त्वाचं राखीव चलन बनलं आहे, असं आंतरराष्ट्रीय अहवाल सांगतात.