
Health Tips : आपले घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. विशेषत:, कुठे पाणी साचत असेल तर, लगेच त्याचा निचरा करण्याची किंवा औषध फवारणी करण्याची नितांत आवश्यकता आहे. या साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढते आणि विविध आजार बळावतात. तब्येत बिघडल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आधीच काळजी घेणे उत्तम ठरते. याबाबतीत सर्वाधिक धोका डेंग्यूचा असतो. यावर वेळीच वैद्यकीय इलाज करणे गरजेचे असते.
एडीस डासांमुळे डेंग्यूचा प्रसार होतो. रोगाची लक्षणे ओळखल्यानंतर त्वरित योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. डेंग्यूची सुरुवात सहसा तीव्र तापाने होते. यानंतर तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी होऊ शकते. गंभीर डेंग्यूमुळे धोकादायक गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि तो जीवघेणा ठरू शकतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डेंग्यूच्या काळात रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईची पाने खरोखरच मदत करतात. डेंग्यूचा संसर्ग झाल्यावर प्लेटलेट संख्या कमी झाल्यास लोक कधीकधी अनेक सहायक उपचारांपैकी एक म्हणून पपईच्या पानांचा वापर करतात. या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी, पॅपेन आणि कायमोपपेन यांसारखी एन्झाइम्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे सूज कमी होण्यास, प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि डेंग्यूमधून बरे होण्यास मदत होते, असे नोएडातील मेदांता रुग्णालयाच्या आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख निधी सहाय यांनी सांगितले.
काही पूर्वीच्या अभ्यासांनुसार तसेच ऐतिहासिक वापरावरून असे सूचित केले आहे की पपईच्या पानांचा अर्क प्लेटलेटची पातळी वाढविण्यात मदत करू शकतो, परंतु पपईच्या पानांचा अर्क पारंपरिक औषधांना पर्याय नाही, असे निधी सहाय म्हणतात. पपईच्या पानांचा रस रक्तातील प्लेटलेट्ससाठी कोणतेही चमत्कारिक पेय नाही, असेही निधी यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इतर वैज्ञानिक संस्था सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सची पातळी वाढवण्यासाठी पपईच्या पानांच्या अर्काच्या वापराच्या फायद्यांना दुजोरा देणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा स्वीकारत नाहीत. सध्या, डेंग्यूशी संबंधित थ्रोम्बोसाइटोपेनियासाठी कोणताही जागतिक आरोग्य संघटना पपईच्या पानांच्या अर्काची शिफारस करत नाही, असेही निधी यांनी सांगितले.