
Health Care : हिवाळा म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते. तापमानात मोठी घट होते. या थंडीची जशी मजा वाटते तसाच अनेकांना या ऋतूचा त्रासही होतो. श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्वचेचा कोरडेपणा वाढतो. बॅक्टेरियांमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. कफ प्रकृती असलेल्या व्यक्तींसाठी हा त्रासदायक काळ असतो. याशिवाय हृदयविकार असलेल्यांनाही हिवाळ्यात त्रास होण्याची शक्यता असते.
हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्या वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. थंड तापमानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि हृदयावरील कामाचा भार वाढतो. योग्य खबरदारी घेतल्यास धोका कमी होतो आणि थंड महिन्यांत सुरक्षित व निरोगी राहण्यास मदत होते.
थंड महिन्यांमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा मायोकार्डियल इन्फेक्शनचा धोका वाढतो आणि अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे, रक्तदाबावर लक्ष ठेवणे आणि ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे यासारखी खबरदारी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, त्याबद्दल जाणून घेऊया...
एक
थंड हवामानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाला जास्त काम करावे लागते. हृदयरोग्यांनी गरम कपडे, स्कार्फ घातल्याने शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यास मदत होते आणि हृदयावरील ताण टाळता येतो.
दोन
श्वसन आणि तापाच्या संसर्गापासून संरक्षण करा. फ्लू सारख्या श्वसन संसर्गामुळे सूज आणि हृदयावरील ताण वाढतो, विशेषतः हृदयरोग्यांमध्ये. फ्लूची लस घेणे आणि चांगली स्वच्छता पाळल्याने हिवाळ्यात हृदयासाठी धोकादायक असलेल्या संसर्गाची शक्यता कमी होते.
तीन
हृदयासाठी आरोग्यदायी आहाराचे पालन करणे ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. अँटीऑक्सिडंट्स असलेल्या हंगामी फळांवर (उदा. संत्री, पेरू) लक्ष केंद्रित करा. नट्स, बिया आणि ओमेगा-३ युक्त मासे यांसारख्या हृदयासाठी चांगल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठ आणि साखरयुक्त पदार्थ मर्यादित प्रमाणात खा. गरम सूप आणि हर्बल टी प्यायल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
चार
थंड हवामानात नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वेळोवेळी तपासा.
पाच
नियमित शारीरिक हालचालींमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाच्या कार्याला आधार मिळतो. सकाळी चालणे किंवा योग आणि एरोबिक्ससारखे इनडोअर व्यायाम हृदयाचे संरक्षण करतात.
सहा
हिवाळ्यात लोक अनेकदा पाणी कमी पितात. परंतु डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होते आणि हृदयाला जास्त काम करावे लागते. दिवसभर पुरेसे पाणी किंवा ज्यूससारखे द्रवपदार्थ प्यायल्याने रक्ताचे प्रमाण आणि हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते.