
मुंबई : गुगलने 'जेमिनी ४ हायड्रोजन' हे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल लाँच केले आहे. रोजची एआयची कामे, कोडिंग आणि एजंटिक वर्कफ्लो अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने करण्यासाठी हे मॉडेल आणले गेले आहे. हे नवीन मॉडेल आधीच्या 'जेमिनी ३.८ फ्लॅश'पेक्षा अडीच पटीने जलद काम करते. हे मॉडेल गुगल एआय स्टुडिओ, जेमिनी एपीआय, व्यवसायांसाठी जेमिनी, जेमिनी ॲप आणि गुगल सर्चवर उपलब्ध करण्यात आले आहे. गुगल एआय प्रो आणि अल्ट्राचे सबस्क्रायबर 'गुगल अँटीग्रॅव्हिटी'द्वारे याचा वापर करू शकतात, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक्स (X) वर एका पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, हे मॉडेल रोजची कामे, कोडिंग आणि एजंटिक वर्कफ्लोमध्ये वेग आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी बनवले आहे. "३.८ फ्लॅशच्या तुलनेत हे २.५ पट वेगाने काम पूर्ण करते. यात थिंकिंगचे (विचार करण्याचे) ४ स्तर आहेत, त्यामुळे तुम्हाला जेवढ्या रिझनिंग डेप्थची गरज असेल, त्यानुसार तुम्ही वाट पाहू शकता आणि पैसे देऊ शकता," असे पिचाई यांनी सांगितले. 'जेमिनी ४ हायड्रोजन'मध्ये लो, मिडीयम, हाय आणि एक्स्ट्रा-हाय असे चार थिंकिंग लेव्हल्स मिळतात, ज्यामुळे युजर्स त्यांच्या गरजेनुसार रिझनिंगची खोली निवडू शकतात.
गुगलने दिलेल्या माहितीनुसार, या मॉडेलची किंमत प्रति दहा लाख इनपुट टोकन्ससाठी १.५० डॉलर्स आणि प्रति दहा लाख आउटपुट टोकन्ससाठी ७.५० डॉलर्स आहे (१ मिलियन टोकन कॉन्टेक्स्ट विंडोमध्ये). गुगलच्या चाचणीनुसार, हायड्रोजनने 'टर्मिनल-बेंच ४.१' या कोडिंग बेंचमार्कवर 'जेमिनी ३.८ फ्लॅश'च्या तुलनेत तिप्पट पेक्षा जास्त स्कोअर मिळवला आहे (१८.२ टक्क्यांच्या तुलनेत ५७ टक्के). तसेच, यामुळे चुकीचे दावे (fabricated claims) तयार होण्याचे प्रमाण पाच पटीने कमी झाले आहे.
याशिवाय, गुगल 'अँटीग्रॅव्हिटी'मध्ये 'ऑर्केस्ट्रेटर' हे नवीन फिचर आणत आहे. हे फिचर कामाच्या गरजेनुसार सेशन दरम्यान डायनॅमिकली एआय मॉडेल्स स्विच करते. 'टर्मिनल-बेंच ४.०'वर, ऑर्केस्ट्रेटरने 'जेमिनी ४ कार्बन'च्या जवळपासचा टास्क सक्सेस रेट मिळवला आहे. विशेष म्हणजे यात सरासरी २४ टक्के कमी कोटा वापरला गेला आणि १९ टक्के वेगाने काम पूर्ण झाले. गुगलच्या मते, हायड्रोजन इतर मॉडेल्ससोबत मिळून काम करू शकते. एक मॉडेल समन्वयाचे काम पाहू शकते, तर दुसरे कोडिंग, टेस्टिंग आणि व्हेरिफिकेशन यांसारखी कामे करू शकते. तसेच हे मॉडेल रिसर्च, डेटा अॅनालिसिस आणि डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स, चार्ट्स, ऑडिओ आणि व्हिडिओ असलेल्या कामांसाठी डिझाइन केले आहे.
'जेमिनी ४' फॅमिलीमध्ये गुगलने याआधी काही मॉडेल्स लाँच केले होते, त्यानंतर आता हे नवे लाँच झाले आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, फायनान्स, कायदेशीर सेवा आणि सायंटिफिक रिसर्चमधील गुंतागुंतीच्या कामांसाठी 'जेमिनी ४ आर्गॉन' आणले होते, तर सायबर सिक्युरिटी आणि सायंटिफिक रिझनिंगसारख्या अधिक वेळखाऊ आणि कठीण कामांसाठी 'जेमिनी ४ कार्बन' आणले होते. गुगलने पुढे सांगितले की, हायड्रोजनमध्ये सुरक्षेबाबतही सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे एजंटिक टास्कमध्ये होणाऱ्या अतिरेकी कृती ८१ टक्क्यांपर्यंत कमी होतात आणि ब्लॉक केलेल्या किंवा अशक्य कामांसमोर परमिशनच्या मर्यादा ओलांडण्याची शक्यता निम्म्याने कमी होते. (एएनआय)