
मुंबई : सोने - चांदीच्या किमतीत मागील अनेक महिन्यांपासून सतत चढ-उतार होत आहेत. आज बुधवारी, २२ जुलै रोजी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान सोने दर २ हजार रुपयांनी वाढला. तर चांदीचा भाव देखील ३००० रुपये प्रति किलोने वधारला.
सराफा बाजारात सोने - चांदीचा भाव वाढला
MCX वर मौल्यवान धातूच्या दरात वाढ झाली. या वाढीमुळे सराफा बाजारातही सोने-चांदीचा भाव वाढला आहे. सोन्याचा दर २००० रुपयांनी वाढला. तर चांदीची किंमत ५००० रुपये प्रति किलो इतकी वाढली आहे.
आजचा सोन्याचा दर किती?
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, आज २२ जुलै रोजी बुधवारी, २४ कॅरेट सोन्याचा भाव २२९० रुपयांनी वाढला. यामुळे २४ कॅरेटचा आजचा भाव १,४६,५१० रुपये इतका आहे.
२२ जुलैला २२ कॅरेटच्या दरात २१०० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव १,३४,३०० रुपयांवर पोहोचला आहे.
आज १८ कॅरेटचा भाव १७२० रुपयांनी वाढला. या वाढीसह १८ कॅरेटचा भाव आज १,०९,८८० रुपये इतका आहे.
चांदीच्या किमतीत मोठी वाढ
दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा भाव आज ५००० रुपयांनी वाढला. या वाढीनंतर चांदीचा एक किलोचा दर २,४०,००० रुपये इतका आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोने-चांदीवर परिणाम
मागील काही दिवसांपासून अमेरिका-इराणमधील संघर्ष, डॉलरचा वाढता भाव, फेडरल बँक व्याजदर वाढीची चिंता अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कारणांमुळे सोने-चांदीच्या किमतीवर त्याचा परिणाम होताना दिसतो आहे.
सोनं खरेदी करताना महत्त्वाच्या गोष्टी तपासा
दरम्यान, सोनं खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. हॉलमार्क तपासूनच सोनं खरेदी करा. तुम्ही घेतलेल्या सोन्याची शुद्धता तपासा. सोन्यावर बीआयएस लोगो, ६ अंकी आणि अक्षरं असलेला एचयूआयडी कोड असल्याचं तपासा. तसंच सोनं खरेदी केल्यानंतर त्याची पावती योग्य किमतीसह घ्या.