
मुंबई : सोने-चांदी दरात सतत चढ-उतार होत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी गगनाला भिडलेले सोन्याचे दर काहीसे खाली उतरले. अमेरिका - इराणमधील संघर्षाचा सोने-चांदी दरावर परिणाम होताना दिसतो आहे. आज बुधवारी पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी मौल्यवान धातूच्या किमती कमी झाल्या आहेत.
सराफा बाजारात सोन्याचा दर किती?
सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर ७७० रुपयांनी घसरला. कमी झालेल्या किमतीमुळे आज २४ कॅरेट गोल्ड रेट १,४४,४९० रुपये इतका आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचा भाव ७०० रुपयांनी कमी झाला आहे. या घसरणीसह सोन्याचा दर १,३२,४५० रुपये आहे.
तर १८ कॅरेट सोन्याची किमतही कमी झाली आहे. ५७० रुपयांनी भाव कमी झाला आहे. त्यामुळे १८ कॅरेटचा आजचा भाव १,०८,३७० रुपये इतका आहे.
दुसरीकडे, सोन्यासह चांदीचा भावही कमी झाला आहे. चांदीचा आजचा भाव २,४५,००० रुपये इतका आहे.
सोन्याचा वायदे भाव किती?
एमसीएक्सवर सप्टेंबर २०२६ डिलिव्हरसाठी चांदीचा वायदे भाव १९३२ रुपयांनी कमी होत २,२८,९२५ रुपये प्रति किलोग्रॅम होता. तर ऑगस्ट २०२६ मध्ये सोन्याचा वायदे भाव ६४२ रुपयांनी घसरला. त्यामुळे या घसरणीसह सोन्याचा दर १,४४,७५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.
सोने-चांदी दरावर परिणाम का होतोय?
दरम्यान, अमेरिकन डॉलरमध्ये वाढ झाली आहे. तर दुसरीकडे महागाई वाढण्याची, महागाई वाढल्यामुळे व्याजदर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच अमेरिकेने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम सोने-चांदी दरावर होत आहे. या बाबींमुळे गुंतवणुकदार धास्तावले आहेत. त्यामुळेच सोने-चांदीमधील गुंतवणूक कमी होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक घटनांचा, गोष्टींचा भारतावर होताना दिसतो. त्याचाच परिणाम सोने-चांदी दरात सतत बदल होतो आहे.