
नवी दिल्ली (२७ सप्टेंबर): आता सणांचे दिवस जवळ आले आहेत. भारतात नवरात्री आणि दिवाळीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती उपकरणे, कार आणि बाईक खरेदीवर बंपर डिस्काउंट आणि ऑफर्स मिळतात. पण यंदा मात्र इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तू महाग होणार आहेत. कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढलाय. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तूंच्या किमती ५ ते ८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांवर सध्या मोठा आर्थिक बोजा पडतोय. कच्च्या मालाच्या किमती, वाहतूक खर्च, परकीय चलनाचा तुटवडा, अनेक देशांमध्ये सुरू असलेली युद्धे आणि पुरवठ्यातील कमतरता यामुळे या वस्तू महाग होत आहेत. वाढलेल्या उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कंपन्यांनी आता किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्पादन खर्च वाढल्यामुळे भाववाढ करणे अटळ असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. एअर कंडिशनर (AC) च्या किमती ५ ते ८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तर वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि एलईडी टीव्ही (LED TV) च्या किमती ३ ते ४ टक्क्यांनी वाढू शकतात.
तांबे, स्टील, ॲल्युमिनियम यांसारख्या आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती वस्तूंच्या किमतीतही ४ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक ब्रँड्सच्या वस्तू १ ऑक्टोबरपासून महाग होत आहेत. तर काही ब्रँड्सच्या उत्पादनांच्या किमती टप्प्याटप्प्याने वाढणार आहेत.