Used Car Buying Guide : जुनी कार घेताय? मग या 5 गोष्टी नक्की तपासा, नाहीतर फसाल

Published : Oct 29, 2026, 01:35 PM IST
Used Car Buying Guide : जुनी कार घेताय? मग या 5 गोष्टी नक्की तपासा, नाहीतर फसाल

सार

कमी बजेटमध्ये सेकंड हँड कार घेताना फक्त गाडीचा लूक बघून भुलू नका. गाडीचं इंजिन, मेकॅनिकल पार्ट्स, कागदपत्रं आणि सर्व्हिस रेकॉर्ड नीट तपासा. टेस्ट ड्राईव्ह घेतल्याशिवाय गाडी फायनल करू नका. यामुळे भविष्यात होणारा मनस्ताप आणि खर्च नक्की वाचेल.

मुंबई : कमी बजेटमध्ये स्वतःची कार घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सेकंड हँड कार हा एक उत्तम पर्याय आहे. नव्या कोऱ्या कारपेक्षा ही गाडी स्वस्तात मिळते, हे याचं मुख्य आकर्षण. पण, फक्त गाडीचा बाहेरचा चकचकीतपणा बघून जर तुम्ही कार घेतली, तर नंतर गॅरेजच्या चकरा मारण्यातच तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे, सेकंड हँड कार घेण्यापूर्वी गाडीची कंडिशन, इंजिन, कागदपत्रं आणि अपघात झालाय का, या गोष्टी बारकाईने तपासणं खूप गरजेचं आहे.

बजेट आणि गरजेनुसार कार निवडा

सेकंड हँड कार घेण्यापूर्वी तुम्हाला नेमकी कोणती गाडी हवीये आणि तुमचं बजेट किती आहे, हे आधी ठरवा. फक्त गाडीची किंमत बघून बजेट ठरवू नका. इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, आरसी ट्रान्सफर, टॅक्स आणि भविष्यात लागणारा मेंटेनन्स या सगळ्याचा खर्च डोळ्यांसमोर ठेवा.

तुमचा रोजचा प्रवास आणि कुटुंबाची गरज ओळखून पेट्रोल, डिझेल, सीएनजी किंवा इलेक्ट्रिक कार यापैकी योग्य पर्याय निवडा. गाडी तपासताना बॉडीवर स्क्रॅच, गंज, खराब पेंट किंवा अपघातानंतर केलेल्या दुरुस्तीच्या खुणा आहेत का, हे नीट बघा. गाडीचे दरवाजे, बोनेट आणि डिक्की उघडून-बंद करून तपासा. ते व्यवस्थित काम करत आहेत ना, याची खात्री करा. गाडीच्या आत बसून सीट्स, एसी, म्युझिक सिस्टीम, पॉवर विंडोज, हेडलाईट्स आणि इंडिकेटर्स चालू आहेत की नाही, हेही तपासून घ्या.

इंजिन आणि मेकॅनिकल पार्ट्स तपासा

वापरलेल्या कारची खरी कंडिशन समजण्यासाठी इंजिन आणि इतर महत्त्वाचे मेकॅनिकल पार्ट्स तपासणं सर्वात महत्त्वाचं असतं. तुम्हाला जर गाड्यांमधलं फारसं काही समजत नसेल, तर ओळखीच्या आणि विश्वासू मेकॅनिकला सोबत घेऊन जाणं कधीही चांगलं. गाडीचं इंजिन, क्लच, गिअरबॉक्स, ब्रेक्स, सस्पेन्शन आणि बॅटरीची कंडिशन तपासून घ्या. इंजिन सुरू केल्यावर काही वेगळा आवाज येतोय का, धूर निघतोय का किंवा ऑईल गळती होतेय का, याकडे विशेष लक्ष द्या.

टेस्ट ड्राईव्ह मस्ट आहे

कार फायनल करण्यापूर्वी टेस्ट ड्राईव्ह घेणं मस्ट आहे. शक्य असेल तर ५ ते १० किलोमीटर गाडी चालवून बघा. यात इंजिन, गिअर शिफ्टिंग, स्टिअरिंग आणि ब्रेक्स कसं काम करतायत, याचा अंदाज येईल. गाडी चालवताना काही विचित्र आवाज आला, गाडी जास्तच हालत असेल, स्टिअरिंग ओढल्यासारखं वाटत असेल किंवा ब्रेक मारताना त्रास होत असेल, तर त्याचं कारण शोधून काढा. मनात शंका ठेवून गाडी विकत घेऊ नका.

गाडीची कागदपत्रं नीट तपासा

सेकंड हँड कार घेताना कागदपत्रांची पडताळणी करणं खूप महत्त्वाचं असतं. गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC), इन्शुरन्स, पीयूसी (PUC) आणि सर्व्हिस रेकॉर्ड्स नीट तपासा. गाडीवर कोणतंही कर्ज किंवा इतर काही थकबाकी नाही ना, याची खात्री करा. जर आधी कर्ज घेतलं असेल, तर ते पूर्ण फेडलंय आणि त्याची एनओसी (NOC) उपलब्ध आहे, हे तपासून घ्या. आरसी बुकवर असलेला इंजिन नंबर आणि चेसिस नंबर गाडीवर असलेल्या नंबरशी मॅच होतोय का, हे नक्की बघा. सर्व्हिस रेकॉर्ड्स उपलब्ध असतील, तर गाडीची वेळेवर सर्व्हिसिंग झालीये का आणि आधी काय काय कामं काढली आहेत, याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.

ओडोमीटर रीडिंग आणि अपघाताची हिस्ट्री तपासा

गाडी आतापर्यंत किती किलोमीटर चाललीये, हे पाहण्यासाठी ओडोमीटर रीडिंग तपासलं जातं. पण, फक्त मीटरवर दिसणाऱ्या आकड्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणं चुकीचं आहे. सर्व्हिस रेकॉर्ड्समधील रीडिंगसोबत हे आकडे मॅच करून बघा. जर काही गडबड वाटली, तर गाडीची आणखी कसून तपासणी करा. गाडीचा आधी काही मोठा अपघात झालाय का, हेही तपासा. गाडीला बाहेरून नवीन पेंट मारलाय, याचा अर्थ गाडीचा अपघात झालाच असेल असं नाही. तसंच, बाहेरून छान दिसणारी गाडी कधीच ठोकली गेली नसेल, असाही गैरसमज करून घेऊ नका. गरज वाटल्यास तज्ज्ञांकडून गाडीची बॉडी आणि महत्त्वाचे पार्ट्स तपासून घ्या.

मार्केट रेटसोबत तुलना करा

तुम्ही जी कार घेताय, त्याच मॉडेलच्या आणि त्याच वर्षाच्या इतर गाड्यांची किंमत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तपासून बघा. जर एखादी गाडी मार्केट रेटपेक्षा खूपच स्वस्तात मिळत असेल, तर त्यामागचं कारण नक्की शोधा. गाडीचं वय, ती किती चाललीये, सर्व्हिस हिस्ट्री, अपघाताची पार्श्वभूमी आणि सध्याची कंडिशन या सगळ्या गोष्टींचा गाडीच्या किमतीवर परिणाम होतो. फक्त स्वस्तात मिळतेय म्हणून घाईघाईने गाडी घेऊ नका.

कार घेण्यापूर्वी हे नक्की लक्षात ठेवा

सेकंड हँड कार घेताना गाडीच्या बाहेरच्या लूकपेक्षा तिच्या खऱ्या कंडिशनला जास्त महत्त्व द्या. इंजिन, मेकॅनिकल पार्ट्स, कागदपत्रं, सर्व्हिस हिस्ट्री आणि ओडोमीटर रीडिंग तपासल्यानंतरच अंतिम निर्णय घ्या. काही शंका असेल तर बाहेरच्या मेकॅनिककडून गाडी तपासून घ्या. गाडी घेण्यापूर्वी घेतलेली ही थोडीशी काळजी तुम्हाला नंतर होणाऱ्या मनस्तापापासून आणि अचानक उद्भवणाऱ्या खर्चापासून नक्की वाचवेल.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Purple Potato: कुफरी जामुनिया! देशातील कुपोषण संपवण्यासाठी आलाय 'पर्पल बटाटा'
SBI Credit Card: एसबीआय क्रेडिट कार्ड वापरताय? 1 डिसेंबरपासून या व्यवहारांवर लागणार एक्स्ट्रा चार्ज