
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कंपन्या आणि नियोक्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. तुम्ही जर एखाद्या कंपनीचे मालक असाल, एचआरमध्ये काम करत असाल किंवा पे-रोल हाताळत असाल, तर १५ नोव्हेंबर २०२६ ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
ईपीएफओने स्पष्ट केले आहे की, ऑक्टोबर २०२६ या महिन्यासाठी इलेक्ट्रॉनिक चलान-कम-रिटर्न (ईसीआर) दाखल करण्याची आणि कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड जमा करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे. संस्थेने १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टद्वारे ही आठवण करून दिली आहे. याचा लाखो नोकरदारांच्या पीएफ खात्यावरही परिणाम होतो, कारण वेळेवर चलन जमा केल्यासच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफचे पैसे विनाअडथळा जमा होतात.
📢 नियोक्ता ध्यान दें!
अक्टूबर 2026 वेतन माह का ECR और देय EPF अंशदान 15 नवंबर तक जमा करना सुनिश्चित करें।
समय पर अनुपालन से कर्मचारियों के खातों में अंशदान का समय पर क्रेडिट होगा और विलंब शुल्क से भी बचाव होगा।
#EPFO #EPFOWithYou #HumHainNa #ECR https://t.co/3IXT3jQJxt
— EPFO (@officialepfo) November 12, 2026
ईपीएफओने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "नियोक्त्यांनी लक्ष द्या! ऑक्टोबर २०२६ च्या वेतन महिन्याचे ECR आणि थकीत EPF योगदान १५ नोव्हेंबरपर्यंत जमा झाल्याची खात्री करा. नियमांचे वेळेवर पालन केल्यास कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेळेवर पैसे जमा होतील आणि उशिरा पैसे भरल्याबद्दल लागणारा दंड टळेल.
जर एखादी कंपनी किंवा नियोक्ता १५ नोव्हेंबरच्या मुदतीत रिटर्न दाखल करण्यास किंवा थकीत रक्कम भरण्यास अपयशी ठरला, तर त्यांना दोन मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.
व्याज आणि मोठा दंड: ईपीएफच्या नियमांनुसार, उशीर झाल्यास थकीत रकमेवर व्याज आणि दंड आकारला जाऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या खात्यात उशीर: जर कंपनीने उशिरा चलन जमा केले, तर ऑक्टोबर महिन्याचे पीएफ योगदान कर्मचाऱ्यांच्या पासबुकमध्ये वेळेवर दिसणार नाही, ज्यामुळे त्यांचे व्याजाचे नुकसान होईल.
अनेकदा असे दिसून येते की शेवटच्या दिवशी पोर्टलवर जास्त ताण आल्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, शेवटच्या तारखेची वाट न पाहता ईपीएफओने प्रक्रिया वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. ईसीआर (ECR) जमा करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक तपशील, पगार आणि पीएफ (PF) कपातीची माहिती काळजीपूर्वक तपासा. फक्त रिटर्न दाखल करणे पुरेसे नाही; १५ नोव्हेंबरपूर्वी बँकेतून पूर्ण पेमेंट झाल्याची खात्री करणेही आवश्यक आहे. तसेच, वेळेपूर्वी रिटर्न दाखल केल्यामुळे पोर्टलवर डेटा व्हेरिफिकेशन किंवा तांत्रिक त्रुटी आल्यास ती दुरुस्त करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही मदतीसाठी, नियोक्ता ईपीएफओ (EPFO) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.