
Electric scooter : भारतात दुचाकी वाहनांची विक्री खूप वेगाने होत आहे. त्यातही इलेक्ट्रिक गाड्यांनाही जास्त पसंती दिली जात आहे. एकेकाळी स्कूटर म्हटल्यावर बजाजची चेतक असे समीकरण दृढ झाले होते. आता बजाज ऑटोने पुन्हा एकदा चेतक स्कूटर बाजारात आणली असून ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यालाही आधीच्याच चेतक प्रमाणे ग्राहकांची मोठी मागणी आहे. या आधी 2021 मध्ये पुन्हा लाँच झाल्यापासून चेतकचे 2.80 लाख युनिट्स विकले गेले आहेत.
बजाज ऑटोने नवीन बजाज चेतक C25 लॉन्च केली आहे. ₹91,399 एक्स-शोरूम किंमत असलेली ही स्कूटर मिड-रेंज इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये एक आकर्षक पर्याय आहे. एक विश्वासार्ह ब्रँड, उत्तम बिल्ड क्वालिटी आणि चांगली रेंज शोधणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करून नवीन चेतक C25 सादर करण्यात आली आहे. चला, तिचे तपशील पाहूया.
डिझाइनच्या बाबतीत, बजाज चेतक C25 मध्ये चेतकची ओळख असलेली निओ-रेट्रो स्टाइल कायम ठेवण्यात आली आहे. यात घोड्याच्या नालाच्या आकाराचा एलईडी हेडलॅम्प, साधे आणि आकर्षक ॲप्रन डिझाइन, साइड पॅनलवर नवीन ग्राफिक्स आणि मागील बाजूस पुन्हा डिझाइन केलेला टेललॅम्प यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चेतक C25 ही फुल-मेटल बॉडी असलेली भारतातील एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्यामुळे ती मजबूत आणि प्रीमियम वाटते.
बूट स्पेस आणि आरामाबद्दल बोलायचे झाल्यास, यात 25-लिटरची बूट स्पेस, 650 मिमी लांब आणि आरामदायक सीट आहे. यामुळे ती दैनंदिन वापरासाठी अतिशय व्यावहारिक ठरते. ही स्कूटर रेसिंग रेड, मिस्टी यलो, ओशन टील, ॲक्टिव्ह ब्लॅक, ओपलेसेंट सिल्व्हर आणि क्लासिक व्हाइट या सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
बजाज चेतक C25 मध्ये कलर एलसीडी डिस्प्ले आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कॉल आणि एसएमएस नोटिफिकेशन्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल्स आणि हिल होल्ड असिस्ट यांसारखे अनेक स्मार्ट फीचर्स समाविष्ट आहेत. हिल होल्ड असिस्टमुळे स्कूटर दोन प्रवाशांसह 19% चा चढ सहज पार करू शकते, जे शहरी आणि डोंगराळ भागांसाठी फायदेशीर आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत, चेतक C25 मध्ये 2.5 kWh बॅटरी पॅक आणि 2.2 kW इलेक्ट्रिक मोटर आहे, जी एका चार्जमध्ये 113 किमी पर्यंतची रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे.
चार्जिंग वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, ही ईव्ही 2 तास 25 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. ही ई-स्कूटर चार तासांत 100 टक्के चार्ज होऊ शकते. 750W ऑन-बोर्ड चार्जर स्टँडर्ड म्हणून दिला जातो. नवीन चेतक C25 मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मागील बाजूस ड्युअल शॉक ॲबसॉर्बर्स आणि हब-माउंटेड मोटर मिळते, ज्यामुळे शहरी रस्त्यांवर चालवणे आरामदायक होते.