
मुंबई: सोशल मीडियावर रील्स स्क्रोल करताना, भारी फॅशनचे कपडे घालून मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यांवरून सहजपणे चालणारी एक मुलगी तुम्ही नक्कीच पाहिली असेल. 'Cool girl from India' या कॅप्शनने जगभरात धुमाकूळ घालणारी ही आहे २५ वर्षांची फॅशन डिझायनर दिया जौकानी. ती फक्त एक इन्फ्लुएन्सर नाही, तर भारतीय फॅशनला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारी मुंबईची एक तरुण कलाकार आहे.
दिया मुंबईत राहणारी एक फॅशन डिझायनर आहे. तिचा स्वतःचा 'DiyaDiya Studio' नावाचा ब्रँड आहे. फॅशन जगतातील पारंपरिक रनवेच्या कल्पना मोडून, तिने आपले डिझाइन्स थेट सामान्य लोकांमध्ये आणले आहेत. यामुळेच दिया इतरांपेक्षा वेगळी ठरते. आपल्या कामाचा आवाका वाढवण्यासाठी तिने 'Diya’s Duniya' नावाची एक वेबसाइटही सुरू केली आहे. इन्स्टाग्रामच्या पलीकडे जाऊन आपली फॅशन ओळख जगासमोर आणण्याचा तिचा उद्देश आहे.
दियाचे व्हिडिओ इतके का चालतात? कारण ते अगदी नैसर्गिक असतात. फ्रँक ओशनच्या 'Nights' गाण्याच्या बॅकग्राउंडवर, ती शांतपणे चहा पित किंवा रस्त्यावरून चालत असताना व्हिडिओ सुरू होतो. पण काही क्षणांतच व्हिडिओचा मूड बदलतो. गर्दीच्या ट्रॅफिकमधून बाईक चालवणे, रस्त्यावरील बकरीला हातात धरून चालणे, जेसीबीवर चढून बसणे, किंवा सलून आणि स्थानिक हॉटेलांमध्ये जाऊन तिथल्या सामान्य लोकांशी गप्पा मारणे, अशा अनपेक्षित गोष्टी दिया करते. तिच्या चेहऱ्यावरचा तो 'कूल' आणि बिनधास्त लूक चाहत्यांना तिच्या व्हिडिओंकडे आकर्षित करतो.
मोठे लक्झरी ब्रँड्स आपले कपडे शूट करण्यासाठी स्टुडिओ किंवा परदेशातील सुंदर लोकेशन्स निवडतात. पण दिया मात्र आपले हाय-एंड कपडे घालून मुंबईच्या साध्या बाजारात आणि गल्ल्यांमध्ये उतरते.
एम्ब्रॉयडरी वर्क पॅटर्न हे दियाच्या कपड्यांचे वैशिष्ट्य आहे. तिचे बहुतेक कपडे ओव्हरसाईज किंवा बॅगी फिटिंगचे असतात, जे एकाच वेळी आरामदायक आणि स्टायलिश दिसतात. भाजीवाले, ऑटोरिक्षावाले आणि लहान मुले तिच्या व्हिडिओंमध्ये सहजपणे येतात. मुंबईची खरी ऊर्जा जगाला दाखवणे हेच आपले ध्येय असल्याचे दिया सांगते.
फेब्रुवारीमध्ये शेअर केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, जगभरातील क्रिएटर्सनी ही स्टाईल कॉपी करायला सुरुवात केली. लंडनच्या गर्दीच्या रस्त्यांवर, मॉस्कोच्या उणे २० डिग्री थंडीत आणि बेरूतच्या बाईक प्रवासातही दियाची 'कूल गर्ल' स्टाईल कॉपी करून व्हिडिओ बनवले गेले. बंगळूरुमध्ये तर परदेशी पर्यटकांनीही डोसा खाताना आणि ऑटोतून प्रवास करताना हा ट्रेंड फॉलो केला.
मोठे रनवे किंवा महागडी लाईटिंग नसतानाही एक कलाकार आपली क्रिएटिव्हिटी जगासमोर कशी मांडू शकतो, हे दिया जौकानीने दाखवून दिलं आहे. मार्केटिंगच्या पलीकडे जाऊन आपल्या शहराची संस्कृती आणि ओळख फॅशनशी जोडल्यामुळेच दिया आज इंटरनेटवरची खरी 'कूल गर्ल' बनली आहे. मुंबईच्या मातीत पाय रोवून जागतिक फॅशनच्या नकाशावर स्वतःची जागा निर्माण करणारी दिया, आजच्या तरुण डिझायनर्ससाठी एक मोठी प्रेरणा आहे.