
सध्याचा काळ स्पर्धेचा आहे आणि ही स्पर्धा जीवघेणी आहे. त्यातच, बदललेले राहणीमान आणि त्यासाठी महागड्या वस्तूंची खरेदी, मग त्यासाठी कर्ज घेणे… अशा पद्धतीने भार वाढतच जातो. ऑफिसमध्ये टार्गेट हा प्रकार असल्याने वेळेत पोहोचल्यानंतर लगेच कामात व्यग्र व्हावे लागते. याशिवाय, नित्य कौटुंबिक प्रश्न आहेतच. हे दडपण वाढत गेले की, डिप्रेशन येते. पण या डिप्रेशनमध्ये केवळ ती संबंधित व्यक्तीच नव्हे तर, संपूर्ण कुटुंबच भरडले जाते.
डिप्रेशन असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. हार्वर्डशी संलग्न असलेल्या मॅस जनरल ब्रिगहॅमच्या संशोधनानुसार, तणावाशी संबंधित मेंदूचे कार्य, मज्जासंस्थेतील अनियमितता आणि दीर्घकाळ टिकणारी सूज यामुळे हा धोका वाढतो.
ज्या रुग्णांना डिप्रेशन आणि चिंता दोन्ही आहेत, त्यांना केवळ एकाच आजाराचे निदान झालेल्यांच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका जास्त असतो, असेही संशोधकांना आढळले. 'सर्क्युलेशन: कार्डिओव्हस्कुलर इमेजिंग'मध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांनुसार, तणाव कमी करणे आणि संबंधित उपचारांमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग टाळण्याची शक्यता आहे.
मॅस जनरल ब्रिगहॅम बायोबँकमध्ये सहभागी झालेल्या 85,551 लोकांच्या डेटाचे संशोधकांनी विश्लेषण केले. यापैकी 14,934 लोकांना डिप्रेशन आणि चिंता दोन्ही होते. 15,819 लोकांना डिप्रेशन किंवा चिंता यापैकी एक होते. तर 54,798 लोकांना दोन्हीपैकी काहीही नव्हते. या अभ्यासात सहभागी झालेल्यांवर सरासरी 3.4 वर्षे लक्ष ठेवण्यात आले. या कालावधीत 3,078 लोकांना हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर किंवा पक्षाघात यासारख्या मोठ्या हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांना सामोर जावे लागल्याचे आढळले.
मॅस जनरल ब्रिगहॅम हार्ट अँड व्हॅस्क्युलर इन्स्टिट्यूटमधील न्यूक्लियर कार्डिओलॉजीचे संचालक आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलचे असोसिएट प्रोफेसर अहमद तवाकोल म्हणाले, 'मागील अहवालानुसार, डिप्रेशन आणि चिंता या हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका वाढवतात, असे आम्हाला आढळले आहे.' डिप्रेशन किंवा चिंता असलेल्या लोकांमध्ये हृदयाच्या ठोक्यांमधील गती कमी आणि रक्तातील सीआरपीची पातळी जास्त असल्याचे संशोधकांना आढळले.
तणाव कमी करणारे उपचार, अँटी-इन्फ्लेमेटरी औषधे किंवा जीवनशैलीतील बदल मेंदू आणि रोगप्रतिकारक मार्कर सामान्य स्थितीत आणण्यास मदत करू शकतात का आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो का, यावर अजूनही अभ्यास सुरू आहे.