
नवी दिल्ली : दिल्लीची मेकअप आर्टिस्ट मोमिनाने एका आठवड्यात तब्बल ४.५ लाख रुपये कमावल्याचा दावा केला आहे. तिच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्वतःला 'सॉफ्ट ग्लॅम स्पेशालिस्ट' म्हणवणाऱ्या मोमिनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली. अवघ्या सात दिवसांत ब्रायडल आणि पार्टी मेकअपच्या बुकिंगमधून तिने ही मोठी कमाई केली आहे.
सिंगापूरहून आलेल्या पूजा जैन या क्लायंटसाठी तिने आठवड्याच्या सुरुवातीला तीन वेगवेगळे मेकअप लूक केले. यासाठी तिने ६३,००० रुपये फी घेतली. त्यानंतर तिने सुरभी ग्रोव्हरचा ब्रायडल मेकअप केला. याआधी सुरभीच्या साखरपुड्याचा मेकअपही मोमिनानेच केला होता. या लग्नाच्या मेकअपसाठी तिला ७३,००० रुपये मिळाले. पुढच्या बुकिंगसाठी तिने दिल्लीहून थेट कसौली गाठलं. तिथे एका ब्रायडल मेकअपसाठी तिने ५५,००० रुपये चार्ज केले. पण, तिची आठवड्यातली सर्वात मोठी कमाई दिल्लीत परतल्यावर झाली. सलोनी नहार आणि तिच्या कुटुंबीयांसाठी तिने अनेक मेकअप लूक केले. यात नवरीचे तीन लूक, तर बहीण आणि आईच्या पार्टी मेकअपचा समावेश होता. या एकाच बुकिंगमधून तिने तब्बल २.२ लाख रुपये कमावले. आठवड्याच्या शेवटी आणखी एका ब्रायडल बुकिंगमधून तिला ३७,५०० रुपये मिळाले.
ही साडेचार लाखांची कमाई मला एका रात्रीत मिळालेली नाही, असं मोमिना स्पष्ट करते. हे यश माझ्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं आणि सातत्याचं फळ आहे, असं ती सांगते. सुरुवातीला स्वतःचा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी आणि कौशल्य सिद्ध करण्यासाठी तिने अनेक मोफत कोलॅबोरेशन्स केले होते. मोमिना म्हणते, "लोकांना फक्त आकडे दिसतात, पण त्यामागची अनेक वर्षांची मेहनत त्यांना दिसत नाही." सतत नवीन गोष्टी शिकत राहिल्यामुळे आणि प्रत्येक क्लायंटला उत्तम सर्व्हिस दिल्यामुळेच मी आज इथवर पोहोचले आहे, असं ती सांगते. तिने आपली कमाई उघडपणे सांगितल्यामुळे अनेक जण तिचं कौतुक करत आहेत. मेकअप आर्टिस्ट बनू पाहणाऱ्या तरुणांसाठी तिची ही यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.