
Socks Recycling Ideas: अनेकदा असं होतं की आपले नवे मोजे काही दिवसांतच अंगठ्याजवळ किंवा तळव्याकडून फाटतात. मग आपण ते सरळ फेकून देतो. पण थांबा! हेच जुने आणि फाटलेले मोजे खूप कामाचे आहेत. या मोज्यांपासून तुम्ही मुलांसाठी खेळणी, घरातल्या वापरासाठी वस्तू, अगदी साबण ठेवायला होल्डरसुद्धा बनवू शकता. चला, आम्ही तुम्हाला अशाच पाच क्रिएटिव्ह आयडिया सांगतो, ज्यामुळे तुम्ही जुन्या मोज्यांचा पुन्हा वापर करू शकाल...
घरात धूळ साफ करण्यासाठी जुनं फडकटं वापरण्याऐवजी तुम्ही सॉक्स वापरू शकता. हा एक भारी उपाय आहे. मोजा थेट हातात घाला आणि फर्निचर, पंखा किंवा टीव्हीसारख्या वस्तू स्वच्छ करा. यामुळे धूळ पटकन निघते आणि साफसफाई सोपी होते. शिवाय तुमचे हातही खराब होत नाहीत.
तुम्ही मुलांच्या खेळण्यासाठी जुन्या मोज्यांपासून मऊ खेळणी (सॉफ्ट टॉय) बनवू शकता. यासाठी मोज्यांमध्ये कापूस किंवा जुन्या कपड्यांचे तुकडे भरा. त्यावर बटणांचे डोळे आणि धाग्याने तोंड बनवा. झालं मुलांसाठी एक गोंडस खेळणं तयार! तुम्ही यात जुने कपडे भरून लहान मुलांसाठी खेळायला एक छोटा चेंडूही बनवू शकता.
जुन्या मोज्यांचा वापर तुम्ही दारासमोर ठेवायला पायपुसणं (डोर मॅट) बनवण्यासाठीही करू शकता. यासाठी अनेक जुने मोजे घ्या आणि त्यांना झिग-झॅग पॅटर्नमध्ये एकमेकांना जोडून शिवा. यातून तुम्ही चौकोनी किंवा आयताकृती आकाराचं एक छान पायपुसणं तयार करू शकता.
उन्हाळ्यात किंवा थंडीत लहान रोपांना हवामानापासून वाचवण्यासाठी तुम्ही जुन्या मोज्यांचा वापर 'मिनी प्लांटर कव्हर' म्हणून करू शकता. यासाठी मोज्याचा वरचा भाग कापा आणि तो थेट झाडाच्या कुंडीवर चढवा. यामुळे रोपांचं संरक्षण होतं.
अंघोळीच्या साबणाचे लहान-लहान तुकडे शिल्लक राहतात. हे तुकडे आणि जुने मोजे वापरून तुम्ही एक मस्त साबण होल्डर बनवू शकता. मोज्यामध्ये साबणाचे उरलेले तुकडे टाका आणि वरच्या बाजूला एक गाठ मारा. आता हा मोजा तुम्ही अंघोळीसाठी किंवा भांडी घासण्यासाठी थेट वापरू शकता.
तुमचा चहा किंवा कॉफी लगेच थंड होते का? किंवा कोल्ड्रिंक जास्त वेळ थंड ठेवायचं आहे? तर जुना मोजा स्वच्छ धुवून घ्या आणि तो कप किंवा बाटलीवर कव्हर म्हणून चढवा. यामुळे तुमच्या पेयाचं तापमान टिकून राहतं आणि पकडायला चांगली ग्रीपसुद्धा मिळते.