
आधुनिक कारमध्ये इलेक्ट्रिक फ्लश डोअर हँडल असतात. काही गाड्यांमध्ये, की दाबल्यावर हँडल आपोआप बाहेर येतो. यामुळे कारला एक फ्युचरिस्टिक लूक मिळतो. भारतातही इलेक्ट्रिक फ्लश डोअर हँडल असलेल्या कार्सची संख्या हळूहळू वाढत आहे. पण आता चीन अशा डोअर हँडलवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचे रिपोर्ट्स आहेत. चीन हा जगातील सर्वात मोठा कार निर्यातदार देश असल्याने, या निर्णयाचा जागतिक ऑटोमोबाईल उद्योगावर परिणाम होऊ शकतो.
रिपोर्ट्सनुसार, चीनने 3.5 टनांपेक्षा कमी वजनाच्या सर्व पॅसेंजर कारमधील पॉवर्ड (इलेक्ट्रिक) डोअर हँडलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे इलेक्ट्रिक डोअर हँडल स्टायलिश आणि भविष्यासाठी अनुकूल दिसतात. पण गंभीर अपघातात कारचा वीजपुरवठा खंडित झाल्यास ते धोकादायक ठरू शकतात, असे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चिनी नियमांमधील नवीन बदलांनुसार, 2027 पर्यंत असे डोअर हँडल बदलावे लागतील, असे म्हटले जात आहे.
अपघातानंतर डोअर हँडलसाठी मेकॅनिकल सिस्टीम अनिवार्य करण्याचा निर्णय चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतला आहे. गंभीर रस्ते अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना इलेक्ट्रिक डोअर हँडलमुळे मोठी समस्या निर्माण होते. चीनमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि म्हणूनच इलेक्ट्रिक डोअर हँडलवर बंदी घालण्यात येत असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
कार कंपन्या डिझाइन, क्रिएटिव्हिटी आणि उत्तम एअरोडायनॅमिक्ससाठी फ्लश डोअर हँडल देतात. हे हँडल कारच्या बॉडीमध्ये सहजपणे मिसळून जातात, ज्यामुळे एक स्टायलिश लूक तयार होतो आणि हवेचा दाब कमी होतो.
या इलेक्ट्रिक डोअर हँडलमध्ये अनेक समस्या आहेत. यामुळेच अलीकडच्या काळात चीनमध्ये हे डोअर हँडल चर्चेचा विषय बनले आहेत. सर्वात मोठी समस्या म्हणजे, कडाक्याच्या थंडीत ते उघडायला कठीण जातात, अशी अनेकांची तक्रार आहे. याशिवाय, अपघातात कारचा वीजपुरवठा खंडित झाल्यास, ते पूर्णपणे निकामी होतात. यामुळे बचावकार्य कठीण होते. इलेक्ट्रिक सिस्टीम निकामी झाल्यास अनेक कार उत्पादक मेकॅनिकल बॅकअप देतात. पण तो सर्व कारमध्ये उपलब्ध नसतो. चीनमधील काही अपघातांमध्ये, लोक आणि बचाव पथके मेकॅनिकल बॅकअप ओळखण्यात किंवा वापरण्यात अयशस्वी ठरले. यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.
चीनमध्ये इलेक्ट्रिक पॉप-आउट फ्लश डोअर हँडलवर बंदी घातल्यास त्याचे जागतिक स्तरावर परिणाम होतील. जपानला मागे टाकून चीन आता जगातील सर्वात मोठा कार निर्यातदार बनला आहे. त्यामुळे, चीनमध्ये लागू केलेले नियम चिनी कंपन्यांना देशांतर्गत बाजारपेठेसाठी आणि निर्यातीसाठी त्यांच्या कारमध्ये बदल करण्यास भाग पाडतील. त्याचप्रमाणे, चीनमध्ये आपल्या गाड्या विकणाऱ्या परदेशी कार कंपन्यांनाही चीनच्या नवीन सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल. ही बंदी फ्लश डोअर हँडलच्या डिझाइनवर नसून, त्याच्या इलेक्ट्रिक कार्यप्रणालीवर असेल हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.