
मुंबई : तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी, 'इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम' (CERT-In) ने एक मोठा इशारा दिला आहे. एजन्सीच्या मते, अँड्रॉइड फोन्समधील अनेक त्रुटींचा सायबर हल्लेखोर गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे तुमचा फोन लवकरात लवकर अपडेट करा, असा सल्ला देण्यात आला आहे.
CERT-In च्या माहितीनुसार, अँड्रॉइडच्या 14, 15, 16, 16 QPR2 आणि 17 या व्हर्जन्समध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटी ऑपरेटिंग सिस्टीमच्या अँड्रॉइड रनटाईम, डॉक्युमेंट्स यूआय, मीडियाटेक फ्रेमवर्क, मीडिया कोडेक्स, मीडिया प्रोव्हायडर, टेलिफोनी, अल्ट्रा वाइडबँड आणि वाय-फाय यांसारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये आहेत.
या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या फोनमध्ये घुसखोरी करू शकतात. ते तुमच्या परवानगीशिवाय कोणताही कोड रन करू शकतात, फोनचा पूर्ण कंट्रोल मिळवू शकतात आणि तुमची खासगी माहिती चोरू शकतात. काहीवेळा ते तुमचा फोन पूर्णपणे बंद पाडू शकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, हॅकर्सना तुमच्या फोनचा असा ॲक्सेस मिळू शकतो, जो सामान्य वापरकर्त्याला मिळत नाही. यामुळे तुमचा सगळा वैयक्तिक डेटा धोक्यात येऊ शकतो.
आजकाल आपल्या स्मार्टफोनमध्ये फोटो, मेसेज, कॉन्टॅक्ट्स, बँकेची माहिती, खासगी कागदपत्रं आणि अनेक ऑनलाइन अकाऊंट्सची माहिती सेव्ह असते. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीममधील या त्रुटींकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. हा धोका अनेक अँड्रॉइड व्हर्जन्सना असल्यामुळे सरकारने दिलेला इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
यावर उपाय काय? तर गुगलने या त्रुटी दूर करण्यासाठी सिक्युरिटी पॅच (Security Patch) जारी केला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फोनमध्ये नवीन सिक्युरिटी अपडेट आलं आहे का, हे तपासून ते लगेच इन्स्टॉल करणं गरजेचं आहे.
बहुतेक अँड्रॉइड फोन्समध्ये Settings > System Settings > Software Update या पर्यायावर जाऊन तुम्ही अपडेट तपासू शकता. काही फोन्समध्ये हा पर्याय Settings > Security and Privacy > System Updates असाही असू शकतो. तुमच्या फोन कंपनीनुसार या पर्यायाचं नाव आणि जागा थोडी वेगळी असू शकते. तुमच्या फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉइड सिक्युरिटी पॅच इन्स्टॉल केलेला आहे, याची खात्री करा.
फक्त सॉफ्टवेअर अपडेट करून चालणार नाही. अनोळखी ठिकाणांहून ॲप्स डाउनलोड करणं टाळा. मेसेज, ईमेल किंवा सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर किंवा फाईलवर क्लिक करू नका. फोनचं सॉफ्टवेअर नेहमी अपडेटेड ठेवून आणि संशयास्पद गोष्टींपासून दूर राहून तुम्ही अशा सायबर धोक्यांपासून बऱ्याच अंशी सुरक्षित राहू शकता.