भारतीय रेल्वेत मेगा भरती, दहावी पास असाल तर करता येणार अर्ज

Indian Railway Bharti 2024 : रेल्वे रिक्रूटमेंट सेल मुंबईने क्रीडा कोट्याअंतर्गत अनेक पदांसाठी भरती जाहीर केली असून यासाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहे.

Rameshwar Gavhane | Published : Jul 22, 2024 5:19 AM IST / Updated: Jul 22 2024, 10:50 AM IST

Indian Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वेकडून मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हीही भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. तुम्ही उत्कृष्ट खेळाडू असाल तर ही संधी तुमच्यासाठी योग्य आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल मुंबईने क्रीडा कोट्याअंतर्गत अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहे. सोमवार, 22 जुलै 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे आणि या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे, त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करावा. रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, भरतीतंर्गत जारी करण्यात आलेली पदं क आणि ड गटातील आहेत.

रिक्त जागांची माहिती

रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या भरती मोहिमेद्वारे एकूम 62 पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. त्यापैकी 21 पदं गट 'क' आणि 41 पदं गट 'ड' ची आहेत. स्तर 5/4 मध्ये 5 पदं आहेत, स्तर 3/2 मध्ये 16 पदं आहेत आणि स्तर 1 मध्ये 41 पदं आहेत. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस, ऍथलीट्स, जर तुम्ही कोणताही खेळ खेळला असेल आणि पातळी गाठली असेल, तर तुम्ही या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता.

शैक्षणिक पात्रता

रेल्वे भरती अंतर्गत जारी करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पदांनुसार, वेगवेगळी असेल. उदाहरणार्थ, स्तर 5/4 साठी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. स्तर 3/2 साठी, बारावी पास किंवा ITI पास किंवा दहावी पास अधिक शिकाऊ उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे, दहावी उत्तीर्ण उमेदवार लेव्हल 1 पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

कसा आणि कोठे कराल अर्ज?

भरतीच्या पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन करता येईल. हे करण्यासाठी तुम्हाला RRCCR च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. तुम्ही rrccr.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकता. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही केवळ अर्जच करू शकत नाही, तर या पदांबद्दल तपशीलवार माहिती देखील मिळवू शकता.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय?

भरतीअंतर्गत येणाऱ्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया 22 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

शुल्क किती भरावे लागणार?

रेल्वेच्या या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावं लागेल. तर SC, ST, EWS, PH आणि महिला उमेदवारांना फी म्हणून 250 रुपये भरावे लागतील.

उमेदवारांची निवड कशी केली जाणार?

उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत होईल. सर्वात आधी सर्व उमेदवारांना चाचणीसाठी बोलावले जाईल. जे योग्य असतील तेच पुढील प्रक्रियेसाठी जातील. दुसऱ्या टप्प्यात खेळांचे कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रशिक्षकाचे निरीक्षण यांचा समावेश असेल. शैक्षणिक पात्रता तिसऱ्या टोकाला दिसेल. पहिला टप्पा 50 गुणांचा, दुसरा 40 गुणांचा आणि तिसरा 10 गुणांचा असेल.

किती वेतन मिळणार?

लेव्हल 5/4 साठी ग्रेड पे रु 2800/2400 आहे. स्तर 3/2 साठी ग्रेड पे 2000/1900 रुपये आहे. लेव्हल 1 साठी ग्रेड पे 1800 रुपये आहे.

आणखी वाचा : 

भारतीय सैन्यात 379 रिक्त जागांसाठी केली जाणार भरती

 

Share this article