बीएसएनएलचा ६० दिवसांचा १२० जीबी डेटा प्लॅन

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवाच्या निमित्ताने बीएसएनएलने एक आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. २७७ रुपयांच्या रिचार्जवर ६० दिवसांसाठी १२० जीबी डेटा मिळणार आहे.

दिल्ली: ग्राहकांना आकर्षक ऑफर्स देणाऱ्या बीएसएनएलने आणखी एका लक्षवेधी रिचार्ज प्लॅनची घोषणा केली आहे. केवळ २७७ रुपये खर्च करून ६० दिवसांसाठी १२० जीबी डेटा वापरण्याची संधी भारत संचार निगम लिमिटेड देत आहे.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ही भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (व्हीआय) या खाजगी कंपन्यांना आव्हान देणारा हा रिचार्ज प्लॅन आहे. २७७ रुपये खर्च केल्यास बीएसएनएलचे ग्राहक ६० दिवसांसाठी १२० जीबी डेटा वापरू शकतील. म्हणजेच दररोज २ जीबी डेटा मिळेल. 'अधिक डेटा, अधिक मजा' या घोषवाक्यासह ही मर्यादित कालावधीची ऑफर बीएसएनएलने जाहीर केली आहे. १२० जीबी डेटाची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड ४० केबीपीएस इतका कमी होईल. १६ जानेवारी २०२५ पर्यंत ही ऑफर रिचार्ज करता येईल.

दरम्यान, इंटरनेटच्या कमी स्पीडबाबत बीएसएनएलच्या ग्राहकांकडून तक्रारी येत आहेत. मात्र, ४जी सेवा सुरू करून ही समस्या सोडवण्याचा बीएसएनएलचा प्रयत्न आहे. आतापर्यंत ६०,००० हून अधिक ४जी टॉवर्स बीएसएनएलने उभारले आहेत.

Share this article