Bike Cleaning Tips : तुमची बाईक नेहमी शोरूममधून नुकतीच काढल्यासारखी चमकावी असं वाटतंय? मग बाईक धुण्याची पद्धत बदला. योग्य वॉशिंग शॅम्पू आणि मायक्रोफायबर कापड वापरा. बाईकची काळजी कशी घ्यायची?
कितीही वर्षं झाली तरी बाईक नव्यासारखी कशी ठेवायची?
आपण खूप आवडीने बाईक घेतो. तिची चमक कायम राहावी असं प्रत्येकाला वाटतं. पण आपल्या नकळत होणाऱ्या काही छोट्या चुकांमुळे गाडीची चमक आणि आयुष्य कमी होतं. अनेक महिने उलटूनही तुमची बाईक नव्यासारखी चमकावी, यासाठी तिची काळजी कशी घ्यायची?
बाईक धुताना आपण करतो या मोठ्या चुका -
चुकीच्या साबणाचा वापर - भांडी घासायचं लिक्विड किंवा कपडे धुण्याची पावडर वापरून बाईक धुणं, ही बहुतेकांची पहिली चूक असते. यातील कडक रसायनांमुळे बाईकच्या पेंटचं नुकसान होतं आणि रंग फिका पडतो.
पाण्याचा जास्त प्रेशर - बाईकवर खूप प्रेशरने पाणी मारल्यास इंजिनचे पार्ट्स, इलेक्ट्रिकल वायरिंग, बॅटरी आणि मीटर कन्सोल सहज खराब होऊ शकतात.
गरम इंजिन - बाईक चालवून आल्यावर इंजिन गरम असतानाच त्यावर पाणी ओतल्यास धातूच्या भागांचं नुकसान होतं. तसंच, उन्हात बाईक उभी करून शॅम्पू लावणंही टाळा.
23
बाईक योग्य पद्धतीने कशी धुवायची?
बाईक नेहमी सावलीत उभी करा. इंजिन पूर्णपणे थंड झाल्यावरच ती धुवायला घ्या. पाण्यात फक्त बाईकसाठी मिळणारा खास शॅम्पूच मिसळा. कडक ब्रश वापरण्याऐवजी मऊ स्पंज किंवा मायक्रोफायबर कापडाने बाईक हलक्या हाताने घासा.
धुवून झाल्यावर स्वच्छ पाण्याने बाईक पूर्णपणे विसळा. त्यानंतर लगेच एका कोरड्या आणि मऊ कापडाने ती पुसून घ्या. पावसात भिजल्यानंतरही हीच पद्धत वापरल्यास बाईक गंजण्यापासून वाचेल.
सायलेन्सरची काळजी -
नव्या पिढीच्या बाईक्समध्ये इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स जास्त असतात. त्यामुळे वॉश करताना सायलेन्सरच्या भोकात पाणी जाणार नाही, यासाठी ते कापडाने झाकून घ्या. आत पाणी गेल्यास इंजिन सुरू होण्यात आणि चालण्यात अडथळा येऊ शकतो. बाईकची चेन साफ करून तिला खास चेन ल्यूब लावल्यास नको असलेला आवाज कमी होतो आणि गाडीचं मायलेजही चांगलं राहतं.
ब्रेक डिस्क आणि टायर्सवर कोणतंही पॉलिश किंवा तेल लागणार नाही, याची काळजी घ्या. नाहीतर ब्रेक लागण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होईल.
33
बाईकची चमक कायम टिकवण्यासाठी...
बाईक पूर्णपणे स्वच्छ करून वाळवल्यानंतर, चांगल्या दर्जाचं वॅक्स पॉलिश वापरणं फायद्याचं ठरतं. यामुळे गाडीला छान चमक मिळते. शिवाय धूळ आणि पाणी सहज चिकटत नाही, यासाठी ते एका ढालीसारखं काम करतं. पण सीट, हँडल बार आणि ब्रेक लिव्हरवर पॉलिश लागणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून हात किंवा शरीर घसरणार नाही.
डिझेल, पेट्रोल किंवा रॉकेलने पेंट केलेले भाग पुसण्याची सवय पूर्णपणे सोडून द्या. या सोप्या टिप्स फॉलो केल्या, तर तुमची बाईक कितीही जुनी झाली तरी शोरूममधून बाहेर काढल्यासारखीच चमकेल.