मुंबई - जॉइंट अकाउंटमध्ये एका व्यक्तीने पैसे जमा केले तरीही, दोहा व्यक्तींनाही इनकम टॅक्सची नोटीस येऊ शकते. अलीकडेच, एका टॅक्स तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती. कर सल्लागार ओ. पी. यादव काय सांगतात.
आयकर रिटर्न (ITR) दाखल करताना जॉइंट बँक अकाउंट असणाऱ्यांना अनेकदा अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अकाउंटमध्ये पैसे एकाच व्यक्तीने भरलेले असले तरी, तो अकाउंट दोन जणांच्या नावावर असल्यामुळे आयकर विभाग दोघांच्या नावावर व्यवहार नोंदवतो. त्यामुळे फक्त नाव असलेल्या व्यक्तीलाही कर विभागाकडून नोटीस येऊ शकते. अलीकडेच एका कर सल्लागाराने याबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जॉइंट अकाउंटधारकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
25
जॉइंट बँक अकाउंटचे नियम
कर सल्लागार ओ. पी. यादव (Prosperr.io) यांच्या मते, ही समस्या Income Tax Rule 114E(2) मुळे उद्भवते. या नियमानुसार, बँक किंवा कोणतीही आर्थिक संस्था जर १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा झाली तर त्याची माहिती थेट आयकर विभागाला पाठवते. जर हा अकाउंट जॉइंट असेल, तर ती संपूर्ण रक्कम दोन्ही धारकांच्या नावावर नोंदली जाते. त्यामुळे पैसे प्रत्यक्षात एका व्यक्तीने भरले असले तरी कर विभागाला ती रक्कम दोघांनी भरल्यासारखी दिसते.
35
जॉइंट अकाउंटमुळे टॅक्स समस्या
यामुळे असे घडते की, जर एका व्यक्तीने १० लाखांची FD केली तर AIS (Annual Information Statement) मध्ये ती रक्कम दोघांच्या नावावर दाखवली जाते. म्हणजेच व्यवहार फक्त एकाने केलेला असला तरी रिपोर्टमध्ये दोघांनी केलेला दाखवला जातो. याच कारणामुळे पैसे न भरलेल्या व्यक्तीलाही आयकर विभागाकडून चौकशी अथवा नोटीस येण्याची शक्यता वाढते. ही परिस्थिती अनेकदा लोकांना अनपेक्षित तणावात टाकते आणि त्यातून गैरसमजही होतात.
ही अडचण टाळण्यासाठी जॉइंट अकाउंट असणाऱ्या व्यक्तींनी आपले AIS नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. जर त्यात चुकीची नोंद दिसली तर त्वरित आयकर विभागाला योग्य तो आक्षेप नोंदवावा. मात्र, यादव यांच्या मते अनेकदा विभाग त्यांच्या दिलेल्या स्पष्टीकरणाला मान्यता देत नाही. त्यामुळे आयकर विभागाकडून Sec 148A (Reassessment) किंवा Sec 133(6) (E-verification) अंतर्गत नोटीस येण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
55
जॉइंट अकाउंटवरील सोलुशन
म्हणूनच जॉइंट अकाउंट धारकांनी कायम सतर्क राहणे गरजेचे आहे. जर चुकीची नोंद झाली असेल तर लगेच स्पष्टीकरण द्यावे. नोटीस आली तरी घाबरून न जाता, योग्य कागदपत्रे सादर करून उत्तर द्यावे. सर्वात चांगला मार्ग म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट किंवा कर सल्लागाराचा सल्ला घेणे. त्यांच्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळेल आणि अनावश्यक त्रास टाळता येईल. जॉइंट अकाउंट उपयुक्त असले तरी त्यातून टॅक्ससंबंधी अडचणी उद्भवू शकतात हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.