
Ayushman Bharat Scheme : पंतप्रधान जनआरोग्य योजना अर्थात आयुष्मान भारत योजना (PMJAY) ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरजू आणि गरीब नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आणि कॅशलेस उपचार दिला जातो. या सुविधेसाठी सर्व सरकारी रुग्णालये आणि अनेक खासगी रुग्णालयांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत हृदयविकार, कॅन्सर, किडनीशी संबंधित आजार, मेंदूचा झटका (स्ट्रोक), लिव्हर सिरोसिस, आणि इतर गंभीर आजारांवर उपचार मोफत मिळतो. त्यात खालील उपचारांचा समावेश आहे:
हृदयाशी संबंधित सर्जरी – डबल वॉल्व रिप्लेसमेंट, कोरोनरी आर्टरी बायपास, पल्मोनरी वॉल्व रिप्लेसमेंट
कॅन्सर उपचार – रेडिएशन थेरपी, केमोथेरपी
ऑर्थोपेडिक सर्जरी – नी आणि हिप रिप्लेसमेंट
न्यूरो सर्जरी – मेंदूशी संबंधित गंभीर ऑपरेशन्स
मुलांच्या शस्त्रक्रिया (पेडियाट्रिक सर्जरी)
स्कल बेस सर्जरी, टिश्यू एक्सपांडर इमप्लांटेशन
एंजिओप्लास्टी स्टेंटसह
डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, मोतीबिंदू यांसारख्या संसर्गजन्य आजारांवरही उपचार मोफत आहेत.
सर्व उपचार या योजनेत समाविष्ट नाहीत. खालील बाबी या योजनेत समाविष्ट नाहीत:
नियमित OPD (बाह्यरुग्ण) तपासणी
मेडिकल गरज नसलेल्या कॉस्मेटिक सर्जरी – उदा. नाकाची शस्त्रक्रिया (रायनोप्लास्टी), फॅट ग्राफ्टिंग, टॅटू रिमूव्हल
कॉस्मेटिक आणि प्रोस्थेटिक डेंटल सर्जरी
वंध्यत्व उपचार (फर्टिलिटी ट्रीटमेंट)
लसीकरण (Vaccination/Immunization)
HIV/AIDS संबंधित उपचार
या योजनेत सर्व शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच, सरकारने सूचीबद्ध केलेली अनेक खासगी रुग्णालये देखील या योजनेअंतर्गत सेवेसाठी पात्र आहेत. यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि वेळीच उपचार मिळू शकतात.
टीप: आपल्या जवळचे कोणते खासगी रुग्णालय या योजनेत समाविष्ट आहे हे पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.