
Avoid These 8 Common Smartphone Charging Mistakes : स्मार्टफोन कसा चार्ज करावा, किती वेळ चार्ज करणे फोनसाठी फायदेशीर आहे? कोणताही चार्जर वापरून फोन चार्ज केल्यास काही नुकसान होईल का? असे अनेक प्रश्न स्मार्टफोन वापरकर्त्यांना पडतात. बॅटरी आणि फोनचे आयुष्य वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स स्मार्टफोन वापरकर्त्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे. स्मार्टफोन चार्ज करताना टाळायला हव्यात अशा आठ चुका येथे सविस्तर दिल्या आहेत.
अनेक वापरकर्त्यांचा असा समज आहे की स्मार्टफोन पूर्णपणे (१०० टक्क्यांपर्यंत) चार्ज करावा आणि गरजेनुसार पुन्हा चार्ज करत राहावा. ही गोष्ट जुन्या निकेल बॅटरींसाठी लागू होती. परंतु, सध्याच्या लिथियम आणि सिलिकॉन-आधारित बॅटरींना सतत शून्य ते १०० टक्के चार्ज केल्यास बॅटरीवर ताण येण्याची शक्यता असते. बॅटरीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी चार्जिंग २० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान ठेवणे उत्तम आहे.
रात्री फोन चार्जिंगला लावून झोपणे ही अनेकांची सवय आहे. पण यामुळे बॅटरीच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, एकदा फोन १०० टक्के चार्ज झाल्यावर, ती पातळी कायम ठेवण्यासाठी फोन कमी प्रमाणात वीज वापरत राहतो, ज्यामुळे 'ट्रिकल चार्जिंग' होते.
गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग, स्ट्रीमिंग यांसारखी जास्त क्षमतेची कामे फोनवर करत असताना चार्जिंग करणे टाळा. फोन चार्ज करत असताना मोठी कामे केल्याने चार्जिंग सायकल अस्थिर होते आणि फोन जास्त गरम होऊ शकतो. चार्जिंग करत असताना, ब्राउझिंग किंवा मेसेज पाठवण्यासारखी हलकी कामे करण्यासाठी फोन वापरणे चांगले आहे.
वाढलेली उष्णता स्मार्टफोनच्या बॅटरीचे आयुष्य कमी करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे फोन गरम होणार नाही याची काळजी घ्या. फोन नेहमी २०-३० अंश सेल्सिअस तापमानात ठेवणे उत्तम आहे. थेट सूर्यप्रकाश पडणाऱ्या ठिकाणी किंवा उशीखाली ठेवून फोन चार्ज करण्याची सवय असेल, तर ती टाळणे चांगले आहे.
वापरकर्ते अनेकदा फोन जास्त वेळ वापरता यावा यासाठी फास्ट चार्जिंगचा आधार घेतात. फास्ट चार्जिंगमुळे चार्ज लवकर होत असला तरी, स्टँडर्ड चार्जिंगपेक्षा जास्त उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे फास्ट चार्जर वापरून चार्ज करताना काळजी घ्या.
जर तुम्हाला स्मार्टफोन काही काळासाठी वापरायचा नसेल, तर बॅटरी १०० टक्के चार्ज करून किंवा पूर्णपणे रिकामी करून ठेवू नका.
कमी दर्जाचे थर्ड-पार्टी अडॅप्टर आणि केबल्स वापरून फोन कधीही चार्ज करू नका. चार्जिंगसाठी मूळ ॲक्सेसरीज वापरणे बॅटरीच्या आयुष्यासाठी फायदेशीर ठरते. चार्जर सुरक्षा मानकांचे पालन करतात की नाही हे तपासण्यासाठी आयफोनमध्ये MFI सर्टिफिकेशन आणि अँड्रॉइड फोनमध्ये USB-IF सर्टिफिकेशन तपासा.
स्मार्टफोनची बॅटरी अधूनमधून कॅलिब्रेट करणे चांगले असल्याचे तज्ज्ञ सांगतात. फोनची बॅटरी कॅलिब्रेट केल्याने बॅटरीची कार्यक्षमता आणि आयुष्य वाढते. कॅलिब्रेशन प्रक्रिया बॅटरीच्या चार्ज पातळीबद्दल अचूक माहिती सुनिश्चित करते.