शेतकरी आणि असंघटित कामगारांसाठी आनंदाची बातमी! अटल पेन्शन योजनेला २०३१ पर्यंत मुदतवाढ

Published : Jan 22, 2026, 06:21 PM IST

Atal Pension Yojana Extension 2031 : केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेला आणखी ५ वर्षांसाठी मुदतवाढ दिली असून, ही योजना आता २०३१ पर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे शेतकरी, ग्रामीण नागरिक, असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळेल.

PREV
16
शेतकरी आणि असंघटित कामगारांसाठी आनंदाची बातमी!

वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेली अटल पेन्शन योजना (APY) आता आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार ही योजना २०३०-३१ आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच २०३१ पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे आजपर्यंत या योजनेत सहभागी न झालेल्या नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरली आहे. विशेषतः शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. 

26
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अटल पेन्शन योजनेला मुदतवाढ देण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली. यासोबतच, या योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी, जनजागृती मोहिमांसाठी आणि विकासात्मक उपक्रमांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच गॅप फंडिंग वाढवण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. 

36
अटल पेन्शन योजना कधी सुरू झाली?

केंद्र सरकारने ९ मे २०१५ रोजी अटल पेन्शन योजनेची सुरुवात केली. असंघटित क्षेत्रातील कामगार, लहान शेतकरी, मजूर आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना वृद्धापकाळात निश्चित उत्पन्न मिळावे, हा या योजनेचा मूळ हेतू आहे. आज ही योजना लाखो नागरिकांसाठी आर्थिक सुरक्षिततेचा मजबूत आधार बनली आहे. १९ जानेवारी २०२६ पर्यंत देशभरात ८६.६ दशलक्षांहून अधिक लोकांनी या योजनेत नोंदणी केली आहे. 

46
अटल पेन्शन योजना म्हणजे काय?

अटल पेन्शन योजना ही सरकार पुरस्कृत सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत निश्चित पेन्शन मिळते. पेन्शनची रक्कम लाभार्थ्याने निवडलेल्या पर्यायावर अवलंबून असते. लाभार्थ्याच्या निधनानंतर ही पेन्शन त्यांच्या पती किंवा पत्नीस मिळते. दोघांच्याही मृत्यूनंतर, जमा झालेली संपूर्ण रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला परत दिली जाते. 

56
अटल पेन्शन योजनेचा लाभ कसा घ्यावा?

या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे बंधनकारक आहे. खाते आधार कार्ड आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याला त्यांच्या वयानुसार आणि निवडलेल्या पेन्शन रकमेप्रमाणे ठराविक मासिक योगदान द्यावे लागते. हे योगदान ऑटो-डेबिट पद्धतीने थेट खात्यातून वसूल केले जाते. अर्ज करण्यासाठी जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अटल पेन्शन योजनेचा अर्ज भरता येतो. 

66
अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता निकष

अर्जदार भारतीय नागरिक असावा

वय १८ ते ४० वर्षे असणे आवश्यक

बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे गरजेचे

ईपीएफ, ईपीएस किंवा अन्य कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा

आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories