
रेनोची भारतातली एकेकाळची सर्वात लोकप्रिय कार, रेनो डस्टर, पुन्हा एकदा परत आली आहे. भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी या मॉडेलचं अनावरण करण्यात आलं. ही नवी डस्टर 17 मार्च रोजी लाँच होईल. जर तुम्ही ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर तिची काही खास वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
2026 रेनो डस्टरला एक रफ अँड टफ पण तितकाच मॉडर्न लूक देण्यात आला आहे. समोरच्या बाजूला आयब्रो-स्टाईल LED DRLs आणि ग्रिलवर एक मोठा 'Duster' बॅज आहे, ज्यामुळे तिला एक आकर्षक लुक मिळतो. जाड क्लेडिंग, चौकोनी व्हील आर्च आणि 18-इंचाचे अलॉय व्हील्स हे तिच्या बॉडीची वैशिष्ट्ये आहेत. मागच्या बाजूला कनेक्टेड LED लाईट बार आणि C-आकाराचे टेल लॅम्प्स तिचा मॉडर्न लूक वाढवतात, तर ब्लॅक रूफ रेल्स आणि सिल्व्हर स्किड प्लेट तिचा रगेड लूक अधिक खुलवतात.
नव्या डस्टरची केबिनसुद्धा एकदम मॉडर्न आहे. यात डार्क ब्लॅक थीम, कॉन्ट्रास्ट स्टिचिंग आणि सिल्व्हर एलिमेंट्ससह लेयर्ड डॅशबोर्ड लेआउट आहे. मॉडर्न लूकसाठी ड्युअल-स्क्रीन सेटअप (इन्फोटेनमेंट आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले) आणि हवामान नियंत्रणासाठी फिजिकल बटन्स देण्यात आले आहेत.
रेनो डस्टर आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. यात वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीसह 10.1-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंचाचा फुल डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-झोन ऑटो एसी, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, 64-कलर ॲम्बियंट लायटिंग, कप आणि फोन होल्डर्ससह रिअर सेंटर आर्मरेस्ट, पॉवर टेलगेट, व्हेंटिलेटेड आणि 6-वे पॉवर-ॲडजस्टेबल फ्रंट सीट्स आणि 6-स्पीकर अर्कामिस ऑडिओ सिस्टम यांचा समावेश आहे.
सुरक्षेच्या बाबतीतही डस्टर कुठेही कमी नाही. यात सहा एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, रेन-सेन्सिंग वायपर्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकर्स, 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, सर्व चाकांवर डिस्क ब्रेक आणि लेव्हल 2 ADAS (ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम) सारखे सेफ्टी फीचर्स आहेत.
डस्टरची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. 21,000 रुपयांच्या टोकन रकमेवर बुकिंग आधीच सुरू झाले आहे. रेनो डस्टर भारतातल्या अशा सेगमेंटमध्ये उतरत आहे, जिथे सध्या सर्वाधिक स्पर्धा आहे. तिची टक्कर नवीन टाटा सिएरा, ह्युंदाई क्रेटा, मारुती व्हिक्टोरिस, मारुती ग्रँड व्हिटारा, किया सेल्टोस, टोयोटा हायरायडर, स्कोडा कुशाक फेसलिफ्ट, होंडा एलिव्हेट आणि एमजी ॲस्टर या गाड्यांशी होईल.