
कॅलिफोर्निया: स्मार्टफोनच्या दुनियेत लवकरच एका मोठ्या ब्रँडची पुन्हा एन्ट्री होणार आहे. पण हा ब्रँड नोकिया किंवा एचटीसी नाही, तर ॲमेझॉन आहे! अमेरिकेतील मोठी टेक कंपनी असलेली ॲमेझॉन पुन्हा एकदा स्मार्टफोन बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१४ मध्ये ॲमेझॉनने 'फायर फोन' बाजारात आणला होता, पण तो सपशेल अयशस्वी ठरला होता.
रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार, ॲमेझॉनच्या या नव्या स्मार्टफोन प्रोजेक्टला 'ट्रान्सफॉर्मर' असं कोडनेम देण्यात आलं आहे. या डिव्हाइसमध्ये ॲमेझॉनचा व्हॉईस असिस्टंट 'ॲलेक्सा' इन-बिल्ट असेल. हा स्मार्टफोन ग्राहकांना प्राइम व्हिडिओ, ॲमेझॉन म्युझिक यांसारख्या सेवांशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी व्हॉईस-कंट्रोल्ड कम्प्युटिंगची कल्पना मांडली होती, जी 'स्टार ट्रेक'सारख्या सायन्स-फिक्शन सीरिजमध्ये दिसणाऱ्या व्हॉईस-ड्रिव्हन असिस्टंटवर आधारित आहे.
कंपनीच्या मते, हा स्मार्टफोन ॲमेझॉनच्या वेगवेगळ्या सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी एक उत्तम माध्यम ठरू शकतो. या फोनमुळे ग्राहक ॲमेझॉनच्या वेबसाइटवरून वस्तू खरेदी करू शकतील, किंडल स्टोअरवरून पुस्तकं वाचू शकतील आणि प्राइम व्हिडिओवर कोणताही अडथळा न येता सिनेमे पाहू शकतील. यामुळे ॲमेझॉनला ॲपलच्या इकोसिस्टमला थेट टक्कर देण्याची संधी मिळेल. कारण ॲपलसुद्धा आपल्या ग्राहकांना म्युझिक, स्ट्रिमिंग आणि इतर सेवा पुरवते.
'ट्रान्सफॉर्मर' प्रोजेक्टवर ॲमेझॉनच्या डिव्हाइस विभागातील 'झिरो वन' नावाची टीम काम करत आहे. या टीमचं नेतृत्व मायक्रोसॉफ्टचे माजी एक्झिक्युटिव्ह जे अलार्ड करत आहेत. ही टीम नेहमीच्या स्मार्टफोन डिझाइनसोबतच, स्क्रीनचं व्यसन कमी करण्यासाठी मदत करणाऱ्या एका साध्या 'डंबफोन' पर्यायावरही विचार करत आहे. या फोनचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात असलेलं AI इंटिग्रेशन. यामुळे पारंपरिक ॲप स्टोअरवरचं अवलंबित्व कमी होऊन व्हॉईस कमांडवर आधारित वापर वाढू शकतो. अर्थात, या नव्या स्मार्टफोनची इतर वैशिष्ट्ये आणि तो कधी लाँच होणार, याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही.
ॲमेझॉनने २०१४ मध्ये 'फायर फोन' लाँच केला होता. जेफ बेझोस यांच्या कल्पनेतून तयार झालेला हा फोन त्यावेळच्या इतर स्मार्टफोन्सपेक्षा खूप वेगळा होता. यात ३डी कॅमेरे होते, जे तुम्ही फोन कसा पाहता यावर अवलंबून स्क्रीनवर एक डायनॅमिक इफेक्ट तयार करायचे. हा फोन 'फायर ओएस'वर चालायचा, जे अँड्रॉइडचं एक कस्टमाइज्ड व्हर्जन होतं. पण त्यात गुगल मॅप्स किंवा प्ले स्टोअरसारख्या गुगल सेवा नव्हत्या. हा फोन एक मोठा फ्लॉप ठरला. विक्री वाढवण्यासाठी ॲमेझॉनने त्याची किंमत ६४९ डॉलरवरून थेट १५९ डॉलरपर्यंत कमी केली. तरीही, लाँच झाल्यानंतर अवघ्या १४ महिन्यांत तो बंद करण्यात आला. या फोनमुळे कंपनीला झालेलं १७० मिलियन डॉलरचं नुकसान ॲमेझॉनने राइट-ऑफ केलं होतं.
सध्या स्मार्टफोन बाजारात ॲपल आणि सॅमसंगसारख्या कंपन्यांचं वर्चस्व आहे. त्यातच मेमरीच्या वाढत्या किमतींमुळे बाजाराच्या वाढीवर परिणाम झाला आहे. २०२६ मध्ये जगभरातील स्मार्टफोन शिपमेंटमध्ये घट होऊ शकते, असंही काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. अशा आव्हानांमध्ये ॲमेझॉनचा हा नवा स्मार्टफोन किती यशस्वी होतो, हे येणारा काळच ठरवेल.