
Aadhaar Card Update : देशातील कोट्यवधी नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणारा निर्णय घेत, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्डच्या वापराबाबत मोठे स्पष्टीकरण दिले आहे. यानुसार, आधार कार्ड आता जन्मतारखेचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे शासकीय कामकाज, शैक्षणिक प्रवेश किंवा अन्य प्रक्रियांमध्ये वय सिद्ध करण्यासाठी नागरिकांना पर्यायी कागदपत्रांचा आधार घ्यावा लागणार आहे.
UIDAI ने स्पष्ट केले की आधारचा मुख्य उद्देश हा व्यक्तीची ओळख पडताळणे हा आहे. आधारवरील जन्मतारीख ही अर्जदाराने दिलेल्या माहितीनुसार नोंदवली जाते. त्यामुळे ती अधिकृत जन्मतारीख प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरता येत नाही. बायोमेट्रिक आणि डेटाबेस प्रमाणीकरणाद्वारे केवळ ओळख निश्चित केली जाते, वय नाही.
या निर्णयानंतर नागरिकांना जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट किंवा इतर अधिकृत कागदपत्रांचा वापर करावा लागणार आहे. विविध संस्था आणि एजन्सींना आधारचा वापर कसा करायचा हे त्यांच्या धोरणांनुसार ठरवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
UIDAI ने पुन्हा एकदा स्पष्ट केले की आधार कार्डचे सर्व प्रकार — फिजिकल कार्ड, ई-आधार, मास्क्ड आधार, QR कोड — हे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वैध राहतील. मात्र, जन्मतारखेसाठी ते वापरता येणार नाही.
दरम्यान, टेक क्षेत्रातूनही मोठी घडामोड समोर आली आहे. गुगलने भारतीय वापरकर्त्यांसाठी Google Wallet मध्ये आधार-आधारित ओळख सुरक्षितपणे साठवण्याची सुविधा सुरू केली आहे. UIDAI च्या सहकार्याने विकसित या फीचरमुळे वापरकर्ते गरजेनुसार मर्यादित माहिती शेअर करू शकतील, ज्यामुळे गोपनीयता अधिक सुरक्षित राहील.
या निर्णयामुळे अनेकांना कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करावी लागणार आहे. विशेषतः शैक्षणिक, बँकिंग आणि सरकारी सेवांमध्ये जन्मतारखेच्या पुराव्यासाठी स्वतंत्र कागदपत्र आवश्यक होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवणे गरजेचे आहे.