
आजकाल आपल्या घरात फोन, कॉम्प्युटर, टीव्ही, इतकंच काय तर स्मार्ट स्पीकरसुद्धा वाय-फायवर चालतात. पण एकाच वाय-फायवर इतकी सगळी उपकरणं जोडली की स्पीड कमी होतो. मग सिनेमे बघताना किंवा ॲप्स डाउनलोड करताना त्रास होतो. मग या समस्येवर काही सोपा उपाय आहे का? ज्यामुळे घरातल्या सगळ्या डिव्हाइसेसवर चांगला स्पीड मिळेल? तर उत्तर आहे, हो! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यासाठी तुम्हाला कोणत्याही तज्ज्ञाची किंवा बाहेरच्या मदतीची गरज नाही. या ५ सोप्या उपायांनी तुम्ही घरच्या घरी वाय-फायचा स्पीड वाढवू शकता.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तुम्ही वाय-फाय राउटर कुठे ठेवता यावर तुमच्या घरात मिळणारा इंटरनेट स्पीड खूप अवलंबून असतो. तज्ज्ञांच्या मते, राउटर घराच्या मध्यभागी ठेवावा. तो भिंतींपासून आणि इतर अडथळ्यांपासून दूर असावा, जेणेकरून नेटवर्क सिग्नल सगळीकडे सारखा पसरेल. तसेच, मायक्रोवेव्हसारखी मोठी उपकरणं त्याच्या जवळ ठेवलेली नाहीत, याची खात्री करा.
आजकाल बहुतेक राउटरमध्ये 2.4GHz आणि 5GHz असे ड्युअल बँड फ्रिक्वेन्सीचे पर्याय असतात. व्हिडिओ कॉल्स आणि गेमिंगसाठी चांगला स्पीड हवा असेल, तर वाय-फाय नेटवर्क 5GHz बँडवर सेट करा. जी उपकरणं राउटरपासून लांब आहेत किंवा ज्यांना जास्त स्पीडची गरज नाही, त्यांच्यासाठी 2.4GHz फ्रिक्वेन्सी पुरेशी आहे.
"एकदा बंद करून चालू करून बघितलं का?" हा सल्ला तुम्ही नक्कीच ऐकला असेल. वाय-फाय राउटरसाठीही हे लागू होतं. राउटर काही वेळासाठी बंद करून पुन्हा चालू केल्यास (रीबूट केल्यास) हार्डवेअर रिफ्रेश होतं आणि स्पीडमधला अडथळा दूर होतो. खरं तर, दर काही दिवसांनी राउटर बंद करण्याची सवय लावा. यामुळे तो जास्त गरम होत नाही आणि त्याचं आयुष्यही वाढतं.
आपल्या वाय-फाय नेटवर्कला किती डिव्हाइस जोडलेली आहेत, हे अनेकदा आपल्या लक्षातही राहत नाही. तुम्ही तुमच्या वाय-फायच्या ॲपमध्ये जाऊन 'मॅनेज डिव्हाइसेस' (manage devices) या सेक्शनमध्ये जा. तिथे जी उपकरणं नेहमी वापरली जात नाहीत, त्यांना नेटवर्कमधून काढून टाका.
कधीकधी वाय-फाय राउटर जुना झाल्यामुळेही इंटरनेटचा स्पीड कमी होतो. अशावेळी, नवीन आणि चांगल्या क्षमतेचा राउटर घेतल्यास तुमच्या इंटरनेटच्या स्लो स्पीडची समस्या कायमची सुटू शकते.
हे सर्व उपाय करूनही तुमच्या इंटरनेटचा स्पीड वाढत नसेल, तर तुमच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरशी (ISP) संपर्क साधा. त्यांना तुमच्या घरातील अशा जागा (ब्लॅक नेटवर्क रिजन) शोधायला सांगा, जिथे नेटवर्क सिग्नल कमजोर असू शकतो.