
DIY Jewellery Wall Holder Easy Ideas: दागिने व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि त्याचवेळी आपल्या रूमची शोभा वाढवण्यासाठी आपण घरच्या घरी मस्तपैकी वॉल होल्डर बनवू शकतो. यात जास्त खर्चही येत नाही आणि तुमचे इकडेतिकडे पडलेले दागिने एकाच ठिकाणी व्यवस्थित राहतात. चला तर मग, घरच्या घरी ज्वेलरी होल्डर बनवण्याच्या काही सोप्या DIY आयडियाज स्टेप-बाय-स्टेप पाहूया.
आपल्या घरात अनेकदा जुन्या फोटो फ्रेम पडून असतात. आपण त्या निरुपयोगी समजून फेकून देतो. पण थांबा, याच फोटो फ्रेमचा वापर करून तुम्ही एक सुंदर ज्वेलरी होल्डर बनवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही कष्ट घ्यायची गरज नाही. फ्रेममध्ये फक्त छोटे-छोटे खिळे ठोका आणि त्यावर तुमचे नेकलेस किंवा कानातले सहज अडकवा.
अनेकदा घरातले जुने हँगर्स आपण भंगारात विकतो किंवा फेकून देतो. पण असं करू नका. या हँगर्सचा उपयोग तुम्ही ज्वेलरी होल्डर म्हणून करू शकता. त्यावर सेफ्टी पिनच्या मदतीने तुम्ही तुमचे दागिने टांगू शकता. हे हँगर तुम्ही भिंतीवरही लावू शकता, ज्यामुळे तुमची रूम अधिक आकर्षक दिसेल.
घरात पडून असलेल्या जुन्या आणि निरुपयोगी की-होल्डरचाही तुम्ही कल्पकतेने वापर करू शकता. या की-होल्डरला छान पॉलिश करा आणि त्याला ज्वेलरी होल्डर बनवा. त्यात अनेक हुक्स असल्याने तुम्ही त्यावर नेकलेस, झुमके, बांगड्या असं बरंच काही अडकवू शकता.
घरात सुतारकाम झाल्यावर उरलेले लाकडाचे छोटे तुकडे किंवा बोर्ड आपण फेकून देतो किंवा थंडीत जाळण्यासाठी वापरतो. पण आता असं करू नका. या लाकडी बोर्डांपासून तुम्ही एक मस्त ज्वेलरी होल्डर बनवू शकता. त्याच्या चारही बाजूंना कापडाची किंवा रंगीबेरंगी कागदाची पट्टी लावा. मग गरजेनुसार त्यावर हुक्स लावून दागिने टांगा. हा वुडन होल्डर तुम्ही भिंतीवर किंवा ड्रेसिंग टेबलजवळ लावू शकता.
तुमच्या बागेतल्या झाडाच्या अनेक वेड्यावाकड्या फांद्या खाली पडतात, ज्या आपण कचरा समजून फेकून देतो. पण या फांद्याही खूप कामाच्या आहेत. यांचा वापर तुम्ही ज्वेलरी होल्डर म्हणून करू शकता. तुम्हाला फक्त या फांद्या स्वच्छ करून, त्यांना पॉलिश करायचं आहे आणि त्यावर तुमचे दागिने टांगायचे आहेत. बघा कसं मस्त दिसेल!