
आपल्या घरात 10 लीटरचा बिसलेरीचा पाण्याचा कॅन रिकामा झाल्यावर आपण तो बहुतेक वेळा फेकून देतो. पण थांबा! या टाकाऊ कॅनपासून तुम्ही अनेक उपयोगी आणि सुंदर वस्तू बनवू शकता. पाण्याच्या कॅनपासून फक्त स्टोरेज बॉक्सच नाही, तर माशांसाठी एक सुंदर एक्वेरियमसुद्धा तयार करता येतं. यासाठी तुम्हाला फक्त कॅन कापण्याची गरज आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या कल्पकतेचा वापर करून त्याला रंग देऊ शकता किंवा दोरीच्या मदतीने छान सजवू शकता. चला तर मग पाहूया, 10 लीटरच्या पाण्याच्या कॅनपासून काय काय बनवता येतं.
तुमच्याकडे 10 ते 20 लीटरचा पाण्याचा कॅन असेल, तर तुम्ही त्यापासून सहज एक फिश एक्वेरियम बनवू शकता. सगळ्यात आधी कॅन आतून-बाहेरून स्वच्छ धुवा आणि समोरच्या बाजूने एक मोठा भाग कापून घ्या. माशांना इजा होऊ नये म्हणून कापलेल्या कडा सँडपेपरने घासून गुळगुळीत करा. तळाशी थोडे खडे किंवा रंगीत दगड टाका. तुम्ही त्यात छोटी शोभेची झाडं किंवा खेळणीही ठेवू शकता. आता त्यात स्वच्छ पाणी भरा. एअर पंप आणि LED लाईट लावली की झालं तुमचं आकर्षक एक्वेरियम तयार! यात तुम्ही गोल्डफिश किंवा गप्पीसारखे छोटे मासे पाळू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, 20 लीटरच्या टँकमध्ये दोन ते चारच मासे ठेवा आणि आठवड्यातून एकदा पाणी नक्की बदला.
गार्डन प्लांटर बनवण्यासाठी 10 लीटरच्या कॅनचा वरचा भाग कापून त्यात माती भरा आणि तुमचं आवडतं रोप लावा. तुम्ही याचा वापर बाल्कनी, टेरेस किंवा किचन गार्डनमध्ये करू शकता. याला तुमच्या आवडीचा रंग दिला, तर ते तुमच्या घराला एक डेकोरेटिव्ह लूक देईल.
मिनरल वॉटरच्या कॅनचा वापर तुम्ही स्टोरेज बॉक्स बनवण्यासाठीही करू शकता. यासाठी कॅनचा वरचा थोडा भाग कापून टाका. आता ग्लू लावून त्यावर सुतळी किंवा ज्यूटची दोरी गोल-गोल घट्ट गुंडाळा. झाकणालाही अशाच प्रकारे सजवा. झाला तुमचा सुंदर स्टोरेज बॉक्स तयार! यात तुम्ही मुलांची खेळणी, कपडे किंवा स्वयंपाकघरातलं सामान सहज ठेवू शकता. झाकण लावल्यावर हा बॉक्स खूपच सुंदर दिसतो.
पाण्याच्या कॅनला आतून इन्सुलेट करून तुम्ही उन्हाळ्यात त्याचा आईस बॉक्स म्हणून वापर करू शकता. पिकनिक किंवा पार्टीमध्ये ड्रिंक्स थंड ठेवण्यासाठी हा एक उत्तम जुगाड आहे.