
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने (CSK) मोठा बदल केलाय. स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी आता भारताचा माजी स्टार पेसर झहीर खान संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. सोमवारी, २१ सप्टेंबरला या निर्णयाची घोषणा करण्यात आली. जुलै महिन्यातच फ्लेमिंग यांचा सीएसकेसोबतचा १८ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास थांबला होता. २००८ मध्ये फ्लेमिंग एक खेळाडू म्हणून सीएसकेमध्ये आले होते. त्यानंतर पुढच्याच वर्षापासून त्यांनी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं. याशिवाय दोन वेळा चॅम्पियन्स लीग टी-२० चषकही जिंकला. फ्लेमिंग यांच्या कार्यकाळात सीएसके १२ वेळा प्ले-ऑफमध्ये आणि १० वेळा फायनलमध्ये पोहोचली. गेल्या जुलैमध्ये त्यांची इंग्लंडच्या पुरुष कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली.
पण, गेल्या काही वर्षांत संघाच्या कामगिरीत मोठी घसरण पाहायला मिळाली. २०२३ मध्ये पाचव्यांदा आयपीएल जिंकल्यानंतर सलग तीन हंगाम सीएसकेला प्ले-ऑफमध्ये जागा मिळवता आली नाही. २०२५ मध्ये तर संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात तळाला राहिला. २०२६ च्या हंगामातही चेन्नईने आठव्या स्थानावर समाधान मानलं. यानंतर फ्रँचायझीने कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. आता या जागी झहीर खानला आणलं गेलंय. भारताचा सर्वात यशस्वी डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या झहीरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने कोचिंग आणि मेंटॉरिंगची जबाबदारीही उत्तमरीत्या सांभाळली आहे. त्यामुळे सीएसकेच्या नव्या पिढीतील खेळाडूंना घडवण्यासाठी त्याचा हा अनुभव खूप महत्त्वाचा ठरू शकतो.
फ्लेमिंग यांच्या एक्झिटनंतर सीएसकेच्या नव्या प्रशिक्षकासाठी अनेक नावांची चर्चा होती. पण, पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या या संघाने अखेर झहीरवरच विश्वास दाखवला. आता संघाला पुन्हा जुन्या यशाच्या ट्रॅकवर आणणं आणि नव्या दमाच्या खेळाडूंना घेऊन एक मजबूत संघ बांधणं, हे झहीरसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे.
२०१७ मध्ये आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर झहीरने वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत. आरसीबी, एमआय आणि डीसी या तीन संघांकडून खेळल्यानंतर, २०१९ च्या आयपीएलपूर्वी त्याला मुंबई इंडियन्सचा (MI) 'डिरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स' बनवण्यात आलं. त्यानंतर त्याने तिथे 'हेड ऑफ ग्लोबल डेव्हलपमेंट' म्हणूनही काम पाहिलं. अगदी अलीकडेच, आयपीएल २०२५ साठी लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर म्हणून त्याच्या नावाची घोषणा झाली होती, पण नंतर त्याने ती फ्रँचायझी सोडली.
एक खेळाडू म्हणून झहीरने १०० आयपीएल सामने खेळले असून त्यात २७.२७ च्या सरासरीने १०२ विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी खेळताना त्याने आपल्या शानदार आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये सर्व फॉरमॅट मिळून एकूण ६१० विकेट्स नावावर केल्या आहेत. आपल्या या नव्या नियुक्तीबद्दल बोलताना झहीर म्हणाला, "आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाचा भाग होणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. एक खेळाडू म्हणून मी मैदानावर सीएसकेचा सामना केलाय आणि त्या लढती मी खूप एन्जॉय केल्या आहेत. चेपॉकमधील 'सुपरफॅन्स' जे वातावरण तयार करतात, त्यामुळे ही गोष्ट आणखीनच खास बनते. एवढा समृद्ध इतिहास असलेल्या या पारंपरिक फ्रँचायझीसोबत जोडलं जाण्यासाठी मी खूप उत्सुक आहे."
संघाच्या मालकीण रूपा गुरुनाथ यांनी झहीरचं स्वागत करताना सांगितलं, "झहीर खान चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य प्रशिक्षक होत आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होतोय. झहीरची शानदार क्रिकेट कारकीर्द आणि युवा टॅलेंटला घडवण्याचं त्याचं कौशल्य आमच्या संघासाठी खूप मोलाचं ठरेल. आम्हाला खात्री आहे की त्याच्या मार्गदर्शनामुळे या फ्रँचायझीचा पाया आणखी भक्कम होईल." सीएसकेचे मॅनेजिंग डिरेक्टर के. एस. विश्वनाथन पुढे म्हणाले, "झहीर हा एक वर्ल्ड क्लास गोलंदाज आहे आणि गेल्या काही वर्षांत त्याने अनेक युवा क्रिकेटर्सना—विशेषतः फास्ट बॉलर्सना—मेंटर केलं आहे. २००० च्या दशकात भारताला मिळालेल्या यशाचा झहीर एक महत्त्वाचा शिल्पकार होता. क्रिकेटच्या बुद्धिमत्तेचा विचार केल्यास तो सर्वोत्तमपैकी एक आहे आणि आमच्या कुटुंबात त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."