Yuvraj Singh : विंटेज युवीचा पुन्हा एकदा धमाका, लेजेंड्स चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Published : Oct 04, 2026, 12:51 PM IST
Yuvraj Singh : विंटेज युवीचा पुन्हा एकदा धमाका, लेजेंड्स चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

सार

कर्णधार युवराज सिंगने पुन्हा एकदा जुन्या स्टाईलमध्ये फलंदाजी करत ४४ चेंडूत ५ चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ७१ धावांची वादळी खेळी केली.

शारजाह : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्समध्ये इंडिया चॅम्पियन्सने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा ४६ धावांनी धुव्वा उडवला आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कर्णधार युवराज सिंगच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने हा दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंडिया चॅम्पियन्सने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १९६ धावांचा डोंगर उभारला. याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा डाव १६.२ षटकांत १५० धावांवर आटोपला.

कर्णधार युवराज सिंगने संघाचे नेतृत्व करताना ४४ चेंडूत ५ चौकार आणि ६ गगनभेदी षटकारांसह ७१ धावा कुटल्या. नमन ओझा (३१), युसूफ पठाण (२० चेंडूत ३७) आणि रिकी धवन (१२ चेंडूत ३५) यांनीही भारतीय संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. कर्णधार उस्मान ख्वाजा शून्यावर तर बेन डंक अवघ्या सहा धावांवर बाद झाला. पण डार्सी शॉर्ट (२८ चेंडूत ६५) आणि जो बर्न्स (३२ चेंडूत ४५) यांनी मिळून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १०० च्या पार नेली.

पण ही भागीदारी तुटताच ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. भारताकडून धवल कुलकर्णीने ४ तर मोहित शर्माने ३ बळी घेतले. पियुष चावलाने दोन आणि हरभजन सिंगने एक विकेट काढली. आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात इंडिया चॅम्पियन्सचा सामना इंग्लंड चॅम्पियन्सशी होणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा: नक्वींची दांडी, जय शहांच्या हस्ते श्रेयस आणि टीमला सुवर्णपदक!
KL Rahul: वेस्ट इंडिजविरुद्ध राहुलचे वादळी शतक, धोनीच्या विक्रमाशी बरोबरी तर युवराजला टाकले मागे