
Indian Cricket Team: मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) नाहीत, त्यामुळे वादही नाही. शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2026) पुरुष क्रिकेटच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला (India vs Pakistan) हरवून सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी आयसीसीचे अध्यक्ष जय शहा (ICC Chairman Jay Shah) यांच्या हस्ते पदके स्वीकारली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (Asian Cricket Council) अध्यक्ष असलेले नक्वी यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, ते पुरुष क्रिकेटच्या फायनलच्या दिवशी स्टेडियममध्ये नसतील. यामागे त्यांनी आधीच ठरलेल्या कार्यक्रमांचं कारण दिलं होतं. पण क्रिकेट वर्तुळात अशी चर्चा आहे की, संभाव्य नामुष्की टाळण्यासाठीच पीसीबी अध्यक्षांनी हा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी पुरुष आशिया कप (Asia Cup 2025) जिंकल्यानंतर भारतीय संघाने नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यावेळी पीसीबी अध्यक्ष ट्रॉफी घेऊन मैदानातून निघून गेले होते. गेल्या महिन्यात महिला आशिया कप जिंकल्यानंतरही भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेतली नव्हती. शुक्रवारी आशियाई क्रिकेट परिषदेने स्पष्ट केलं होतं की, नक्वी मैदानात उपस्थित नसतील. यानंतर हे स्पष्ट झालं होतं की, पाकिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकल्यास भारतीय खेळाडू पदक स्वीकारतील. जय शहा यांनी पदक दिल्याने कोणालाही अडचण नव्हती. पाकिस्तानी खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या एका अधिकाऱ्याने रौप्यपदक दिलं. तर श्रीलंकेच्या (Sri Lanka) खेळाडूंना दुसऱ्या एका अधिकाऱ्याने पदकं दिली.
२०२३ मध्ये हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकलं होतं. यावेळी महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. महिला संघात सीनियर खेळाडूंचा समावेश होता. पण पुरुष संघात प्रामुख्याने युवा खेळाडू होते. याच युवा खेळाडूंनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. पाकिस्तान पुन्हा एकदा भारतासमोर ढेर झाला. मैदानावर आणि मैदानाबाहेरही भारतानेच बाजी मारली.