
INDW vs AUSW, 2nd Semifinal: भारताने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव करत इतिहास रचला आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील भारतीय संघाने केलेला हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आहे. जेमिमा रॉड्रिग्सने शानदार शतक झळकावून टीम इंडियाचा विजय सोपा केला. त्याचबरोबर कर्णधार हरमनप्रीत कौरनेही या विजयात मोठे योगदान दिले. अखेरीस, ऋचा घोषने अप्रतिम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना हिसकावून घेतला आणि भारताला अंतिम फेरीत पोहोचवले. २ नोव्हेंबरला भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
या सामन्यावर नजर टाकल्यास, ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ४९.५ षटकांत १० गडी गमावून ३३८ धावा केल्या. फिबी लीचफिल्डने ९३ चेंडूत १७ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ११९ धावांची स्फोटक खेळी केली. तिच्याशिवाय एलिस पेरीनेही ७७ धावांचे योगदान दिले. ऍशले गार्डनरनेही ४५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या. तर कर्णधार एलिसा हिली केवळ ५ धावा करू शकली. बेथ मुनीची बॅटही चालली नाही. तिने केवळ २४ धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मोठ्या उपांत्य सामन्यात भारतीय गोलंदाजीत फारशी धार दिसली नाही. श्री चरनीने या सामन्यात सर्वाधिक २ बळी घेतले. तिने १० षटकांत ४९ धावा दिल्या. तिच्याशिवाय दीप्ती शर्मानेही २ बळी घेतले, पण ती महागडी ठरली. तिने ९.५ षटकांत ७३ धावा दिल्या. क्रांती गौड, अमनजोत कौर आणि राधा यादव यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला. मात्र, सर्वच गोलंदाजांनी ५० हून अधिक धावा दिल्या.
भारतासमोर ३३९ धावांचे विशाल लक्ष्य होते, जे जेमिमा रॉड्रिग्सने सोपे केले. तिने १३४ चेंडूत १४ चौकारांच्या मदतीने १२७ धावांची नाबाद खेळी करत ४८.३ षटकांत सामना जिंकून दिला. तिच्याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरनेही ८८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची अप्रतिम खेळी केली. हरमन आणि जेमिमाने मिळून १६७ धावांची भागीदारी केली. ऋचा घोषनेही शेवटी १६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २६ महत्त्वपूर्ण धावा केल्या. दीप्ती शर्मानेही २४ धावांचे योगदान दिले.