
तिरुवनंतपुरम (२७ सप्टेंबर): वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाने ८ विकेट्स राखून शानदार विजय मिळवला आहे. विंडीजने दिलेलं २९६ रन्सचं टार्गेट भारताने ४१.४ ओव्हर्समध्ये फक्त २ विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. या मॅचमध्ये शुभमन गिलने ११० रन्सची खेळी केली, तर विराट कोहलीने नाबाद १३९ रन्स कुटले. या विजयासह भारताने ३ मॅचच्या वनडे सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
२९६ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात एकदम जबरदस्त झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली पार्टनरशिप करत विजयाचा पाया रचला. रोहित शर्मा ३२ रन्स करून आऊट झाला. त्यानंतर गिल आणि विराट कोहलीने जी काही तुफान बॅटिंग केली, त्यामुळे विंडीजचा पराभव निश्चित झाला. शुभमन गिलने आक्रमक खेळत आपलं शतक पूर्ण केलं. तो १०८ बॉल्समध्ये ११० रन्स काढून आऊट झाला.
विराट कोहलीनेही मैदानात चौकार-सिक्सचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या ७४ बॉल्समध्ये आपलं शतक साजरं केलं. विराटने ८८ बॉल्समध्ये नाबाद १३९ रन्सची वादळी खेळी केली. सोबतच ऋतुराज गायकवाडने नाबाद १३ रन्स केले. अशाप्रकारे टीम इंडियाने ४१.४ ओव्हर्समध्येच मॅच जिंकली. ४२ व्या ओव्हरच्या तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग दोन सिक्स मारत विराटने मॅच एकदम स्टाईलमध्ये फिनिश केली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या पहिल्या मॅचमध्ये विराटने तब्बल ९ सिक्स मारले. यासोबतच त्याने वनडे इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड बनवला आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.