T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिल-जितेश शर्मा बाहेर, संजू संघात

Published : Dec 20, 2025, 02:25 PM IST
T20 World Cup Indian Team Announced

सार

T20 World Cup Indian Team Announced : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत खेळलेल्या बहुतेक खेळाडूंनी विश्वचषक संघात स्थान मिळवले आहे. पण काहींना विश्रांती देण्यात आली आहे.

T20 World Cup Indian Team Announced : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी २०२६ टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या निवडीत निवड समितीने अत्यंत कठोर आणि धक्कादायक निर्णय घेत युवा फलंदाज शुभमन गिलला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अनुभवी सूर्यकुमार यादवकडेच संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.

शुभमन गिलची हकालपट्टी: सर्वात मोठी बातमी

या संघ निवडीतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे शुभमन गिलची अनुपस्थिती. काही काळापूर्वी गिलकडे भारतीय संघाचा भावी कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून पाहिले जात होते. मात्र, त्याला केवळ उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलेले नाही, तर संपूर्ण संघातूनच वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेलची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

इशान किशनचे पुनरागमन, जितेश शर्माचा पत्ता कट

यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी निवड समितीने मोठा बदल केला आहे. गेल्या काही मालिकांमध्ये संधी मिळालेल्या जितेश शर्माला खराब फॉर्ममुळे वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी घरगुती आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या इशान किशनला पुन्हा संघात स्थान मिळाले आहे. संजू सॅमसनच्या रूपाने संघात दुसरा यष्टीरक्षक पर्याय उपलब्ध आहे.

मध्यम फळीत 'पॉवर' वाढली

फिनिशरच्या भूमिकेत आपली चमक दाखवणाऱ्या रिंकू सिंगला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले आहे. तसेच, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने देखील संघात पुनरागमन केले आहे. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांसारख्या खेळाडूंमुळे भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही बाजू भक्कम दिसत आहेत.

२०२६ टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघ:

  1. सूर्यकुमार यादव (कर्णधार)
  2. अक्षर पटेल (उपकर्णधार)
  3. अभिषेक शर्मा
  4. तिलक वर्मा
  5. हार्दिक पांड्या
  6. शिवम दुबे
  7. जसप्रीत बुमराह
  8. अर्शदीप सिंग
  9. वरुण चक्रवर्ती
  10. कुलदीप यादव
  11. हर्षित राणा
  12. संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
  13. इशान किशन (यष्टीरक्षक)
  14. वाशिंग्टन सुंदर
  15. रिंकू सिंग

गोलंदाजीची धुरा बुमराहच्या खांद्यावर

भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व अनुभवी जसप्रीत बुमराह करेल, तर त्याला अर्शदीप सिंग आणि युवा हर्षित राणा साथ देतील. फिरकी विभागात कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांची 'मिस्ट्री' जोडी प्रतिस्पर्धी संघासमोर मोठे आव्हान उभे करेल.

निवड समितीच्या या निर्णयामुळे भारतीय संघ आता पूर्णपणे नव्या आणि आक्रमक मानसिकतेने २०२६ च्या विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. शुभमन गिलला वगळण्याचा निर्णय योग्य की अयोग्य, यावर आता क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

 

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

WPL 2026 : मुंबई vs बंगळुरू, पहिला सामना कधी, कुठे आणि मोफत कसा पाहाल?
सिडनीमध्येही ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर 5 विकेट्सनी विजय, मिचेल स्टार्क मालिकावीर