
Vaibhav Sooryavanshi-Sunil Gavaskar: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची बॅटिंग पाहून क्रिकेटचा देव सुनील गावसकरही थक्क झालेत. नुकतंच एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 (ACC Men's Asia Cup Rising Stars 2026) स्पर्धेत यूएई (UAE) विरुद्ध वैभवने फक्त ५३ चेंडूत २०४ धावांची स्फोटक खेळी केली. या मुलाचा निडर अंदाज, षटकार मारण्याची जबरदस्त ताकद आणि नवनवीन शॉट्स खेळण्याची पद्धत पाहून गावसकर चांगलेच प्रभावित झालेत. सोनी स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'लिमिटेड ओव्हर्सच्या मॅचेसमध्ये जेव्हा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नव्या चेंडूवर षटकार ठोकायचा, तेव्हा मी मंत्रमुग्ध होऊन पाहायचो. वीरेंद्र सेहवागलाही (Virender Sehwag) तसं खेळताना पाहायला मला खूप आवडायचं. कारण तसे शॉट्स खेळण्याची हिंमत माझ्यात नव्हती. कदाचित टॅलेंट होतं, पण डेअरिंग नव्हतं. कारण जर तसा शॉट मारताना आऊट झालो, तर टीममधले मित्र काय विचार करतील, हीच चिंता डोक्यात सतत असायची.'
आजच्या पिढीतील भारतीय बॅटर्सचा आक्रमक अॅटिट्यूड गावसकर खूप एन्जॉय करत आहेत. ते पुढे म्हणाले, 'जेव्हा सेहवाग, वैभव, अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) किंवा संजू सॅमसन (Sanju Samson) बॅटिंग करायला सुरुवात करतात, तेव्हा माझ्या आतला एक लहान मुलगा जागा होतो. तेव्हा मी फक्त एक फॅन असतो. मी मुळात क्रिकेटचा चाहता आहे. आणि एक चाहता म्हणून अशी बॅटिंग पाहायला मला खूप भारी वाटतं. एखादा भारतीय क्रिकेटर असं खेळला तर हा आनंद आणखीच द्विगुणित होतो.'
यूएईविरुद्ध तुफानी फटकेबाजी करत वैभवने फक्त लिस्ट 'ए' क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतकाचा रेकॉर्ड मोडला नाही, तर एका वन-डे इनिंगमध्ये सर्वाधिक २८ षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. या युवा स्टारला सल्ला देताना गावसकर म्हणाले, 'त्याच्या कुटुंबाने त्याला 'वैभव सूर्यवंशी' म्हणून न पाहता, फक्त 'वैभव' म्हणून पाहणं खूप गरजेचं आहे. जेव्हा घरचे त्याला 'वैभव सूर्यवंशी' म्हणून पाहू लागतील, तेव्हाच त्याच्यासाठी एक वेगळी ओळख तयार होईल. घरातील इतर सदस्यांप्रमाणेच त्यालाही सामान्य वागणूक मिळायला हवी. सचिनच्या बाबतीतही अगदी असंच घडलं होतं.'
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.