
कोलकाता: आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यांच्याच घरच्या मैदानावर, म्हणजेच ईडन गार्डन्सवर सनरायझर्स हैदराबादने (SRH) कोलकाताचा तब्बल ६५ धावांनी धुव्वा उडवला. या हंगामातला हैदराबादचा हा पहिला विजय आहे, तर कोलकाताचा हा सलग दुसरा पराभव ठरला. हैदराबादने दिलेलं २२७ धावांचं मोठं लक्ष्य गाठताना कोलकाताचा संघ १६ षटकांत १६१ धावांवरच ऑलआऊट झाला.
कोलकाताकडून फक्त अंगकृष रघुवंशीने २९ चेंडूत ५२ धावा, फिन ऍलनने ७ चेंडूत २८ धावा आणि रिंकू सिंगने २५ चेंडूत ३५ धावा करत थोडीफार लढत दिली. हैदराबादकडून जयदेव उनाडकटने तीन विकेट्स घेतल्या, तर नितीश कुमार रेड्डी आणि इशान मलिंगा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. स्कोअर: सनरायझर्स हैदराबाद २० षटकांत ८ बाद २२६, कोलकाता नाईट रायडर्स १६ षटकांत १६१ वर ऑलआऊट.
२२७ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताचा सलामीवीर फिन ऍलनने स्फोटक सुरुवात केली. कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन ऍलनला स्ट्राईक दिली. त्यानंतर ऍलनने पुढच्या ५ चेंडूंमध्ये २४ धावा कुटल्या. पहिल्याच षटकात २५ धावा आल्या, पण दुसऱ्याच षटकात हर्ष दुबेच्या गोलंदाजीवर ऍलन रिटर्न कॅच देऊन बाद झाला. हा कोलकातासाठी मोठा धक्का होता. कर्णधार अजिंक्य रहाणे (१० चेंडूत ८) स्वस्तात परतला, तर कॅमेरून ग्रीन (२) धावबाद झाल्याने कोलकाताच्या आशा जवळपास संपल्या.
अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग यांनी ४६ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण रघुवंशी धावबाद झाल्याने कोलकाताला आणखी एक मोठा धक्का बसला. शेवटची आशा असलेला रिंकू सिंगही ३५ धावांवर नितीशच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि कोलकाताचा पराभव निश्चित झाला. सुनील नारायणने (४ चेंडूत १२) सुरुवातीला दोन षटकार मारले, पण त्याची फटकेबाजी फार काळ टिकली नाही. रमणदीप सिंग (१०) पुन्हा एकदा अपयशी ठरला.
याआधी, टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ८ गडी गमावून २२६ धावांचा डोंगर उभारला. हेनरिक क्लासेनने ३५ चेंडूत ५२ धावा करत हैदराबादसाठी सर्वाधिक धावा केल्या. अभिषेक शर्माने २१ चेंडूत ४८ धावांची तुफानी खेळी केली, तर दुसरा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने २१ चेंडूत ४६ धावा केल्या. कोलकाताकडून ब्लेसिंग मुझाराबानीने चार, तर वैभव अरोराने दोन गडी बाद केले.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.