
Smriti Mandhana–Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना लग्न मोडल्याच्या चर्चेनंतर पहिल्यांदाच एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाली. या कार्यक्रमात संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर देखील उपस्थित होती. मंचावर संवादादरम्यान स्मृतीने अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलत क्रिकेटवरील तिचं प्रेम पुन्हा अधोरेखित केलं.
सूत्रसंचालक आणि क्रिकेट समालोचक मंदिरा बेदी यांनी स्मृतीला विचारलं की, “आयुष्यात एवढे चढ-उतार असूनही तू क्रिकेटवर इतकं लक्ष कसं केंद्रित ठेवतेस?” या प्रश्नावर स्मृती म्हणाली, “मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडतं. भारतीय जर्सी घालणं हीच सर्वात मोठी प्रेरणा आहे. आयुष्यात काहीही चालू असलं तरी मैदानावर गेल्यावर बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवता येतात. क्रिकेट मला आयुष्याबद्दल पुन्हा फोकस करण्याची ताकद देते.”
स्मृतीने 2025 च्या विश्वचषकाबद्दल बोलताना सांगितलं, “2025 चा विश्वचषक हा आम्ही गेल्या काही वर्षांत घेतलेल्या संघर्षांचे बक्षीस होता. मी 12 वर्षांपेक्षा जास्त काळ खेळते आहे आणि या कालावधीत मला कळलं की, कधी कधी गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत.
स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा केली. जरी दोघांनीही कारण स्पष्ट केलेलं नसले तरी, पलाशच्या दुसऱ्या अफेअरमुळे हे लग्न मोडलं असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र या दोघांनीही वैयक्तिक गोष्टी सार्वजनिकरित्या न वाढवण्याची भूमिका घेतली आहे.
आपल्या अधिकृत पोस्टमध्ये स्मृती म्हणते, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. मी खूप खाजगी स्वभावाची आहे, पण हे स्पष्ट करते की लग्न रद्द झालं आहे.हा विषय इथेच संपवावा, अशी मी सर्वांना विनंती करते. दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या गतीने पुढे जाण्यासाठी मोकळीक द्यावी.” स्मृतीच्या या पोस्टनंतर पलाश मुच्छलनेही अशाच आशयाची पोस्ट शेअर केली.